हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:50 AM2018-02-12T00:50:52+5:302018-02-12T00:50:59+5:30
जिल्ह्याला रविवारी पावसाने झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली, तर अनेक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मात्र अतोनात नुकसान झाले, जनावरेही दगावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याला रविवारी पावसाने झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली, तर अनेक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मात्र अतोनात नुकसान झाले, जनावरेही दगावली. हिंगोली शहरात ११ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ८ वाजता हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुराणानगर येथील घरावरही वीज कोसळली.
आडगाव रंजे येथे पाऊस
जवळा बाजार : वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे रविवारी सकाळी ९ वाजता दमदार पाऊस झाला हा पाऊस ३० मिनिटापेक्षा जास्त होता. त्यामुळे सध्या काढणीस आलेले हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच करंजाळा बाराशिव परिसरात ५ वाजता गारांचा पाऊस झाला.
आडगाव रंजे येथे रविवारी सकाळपासून ढग भरून आले होते. ९ वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकºयांची मोठी धांदल उडाली. कारण या परिसरात हरभरा काढणी जोरात चालू आहे. काही शेतकºयांनी हरभरा कापून टाकलेला आहे. काहींनी सुडी लावली तर काही शेतकºयांची कापणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर काही ठिकाणी ज्वारी कापली आहे. कापलेली ज्वारी पावसाने काळी पडणार असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, ज्वारी व इतर पिकांचे चांगले नुकसान झाले आहे.
मेघगर्जनेसह पाऊस
वारंगाफाटा: मागील चार दिवसांपासून वारंगा फाटा व दांडेगाव परिसरात ढगाळ वातावरण असून रविवार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जोरदार मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नसून सायंकाळी चारच्या सुमारास वारे वाहू लागले आणि पाऊस पडणार असे वातावरण होते. परिसरातील हरभरा, गहू, ज्वारी तसेच हळद आणि केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अनेक शेतकºयांच्या शेतातील हरभरा काढून ढीग टाकले तर अनेकांच्या शेतातील हरभरा गहू पिक काढावयास आले आहे. तसेच हळ्द पिक काढणी चालू आहे, तर केळी देखील निसवत आहेत. परिणामी तोंडी आलेला घास हिसकावून जाण्याची भीती शेतकºयांना आहे.
करंजी येथे गारांचा पाऊस
करंजी : वसमत तालुक्यातील करंजी येथे ढगाळ वातावरणासह पावसाला सुरूवात झाली तर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास गारांची पाऊस झाला. ज्वारी, हरभरा, कापूस, तुर, आदीची नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
कुरूंदा येथे रिमझिम पाऊस
कुरूंदा : येथे रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर मेघगर्जनेसह परिसरात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे अनेकांची एकच तारांबळ उडाली. शेतकºयांच्या पिकांचे नुकसानही झाले.
कळमनुरीत ढगाळ वातावरण
कळमनुरी : येथे सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. दिवसभर मेघगर्जना व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत होते.
औंढा येथे हरभरा पिकाचे नुकसान; गाय दगावली
औंढा नागनाथ : तालुक्यातील रविवारी दिवसभरात दोन वेळा हजेरी लावून हरभरा पिकांचे नुकसान केले आहे. तसेच सावळी तांडा येथे वीज पडून गाय ठार झाल्याची घटना घडली आहे.
येहळेगाव, जवळाबाजार, शिरडशहापूर, औंढा नागनाथ या चारही विभागात सकाळपासून पावसाची सुरूवात झाली. सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर दुपारी ३.३० दरम्यान सर्वत्रच जोरदार पाऊस झाल्याची नोंद आहे. परिसरात गारा व वारा कमी असल्याने गव्हाचे तेवढे नुकसान झाले नाही. परंतु शेतात काढून टाकलेला हरभºयाचे नुकसान झाले. सावळी तांडा येथील माधव रोडगे यांनी गोठ्यात बांधलेल्या गायीच्या अंगावर वीज पडल्याने ती ठार झाली. महसूल विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.
वीज पडून नुकसान
खुडज : येथे दोन ठिकानी विज पडली. यात जिवीत हानी नाही. हवमान खात्याने वर्तविलेल्या प्रमाणे ११ फेब्रुवारी रोजी विजेच्या कडकडाटांसह पावसाचा तडाखा परिसरातील शेतकºयांच्या पिकांना बसला. यात गहु, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर खुडज परिसरात दोन ठिकाणी गावालगत विजा पडल्या. एक ठिकाणी लिंबाच्या झाडावर तर दुसरी बाळकिसन झाडे यांच्या शेतात वीज पडली. यात विहीरीवरील मोटरपंंपचा केबल, स्टँटर जळाले. तर दुसरी वीज माधव राहटे यांच्या शेतात पडली.
गोरेगाव येथे रिमझिम पाऊस
गारेगाव : येथे रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परंतु रिमझिम पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. परिसरातील गारपीटीमुळे मात्र शेतकरी चिंतातुर झाले होते.
कडोळीत मुसळधार पाऊस
कडोळी : येथे विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हतबल झाले आहेत.
राज्य रस्त्यावर लालमातीच्या वापराने चिखल
शिरडशहापुर : शिरडशहापूर ते वसमतकडे जाणाºया मुख्य राज्य रस्त्याच्या रूंदीकरणाच्या विकास कामाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकण्यात आले; परंतु काही ठिकाणी मुरूमऐवजी लालमातीचाच सर्रास वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य दिसून आले. या चिखलामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली.
राज्यरस्ता विकास कामांतर्गत शिरडशहापूर ते वसमत फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरू झाले. कामासाठी गौणखनिज दगड, खडक, मुरूम, गिट्टी, वाळू इत्यादी लाखों ब्रॉसची शासकीय गायरान जमीन व खासगी मालकी जमीन, नद्यांमधून उत्खनन करून विना परवाना राजरोसपणे दिवासा-ढवळ्या चोरी करून रस्त्यावर टाकण्यात येत आहे.
सध्या मुरूम टाकून दबई करण्याचे काम चालू आहे. मुरूमऐवजी लाल माती टाकण्यात आली आहे. लालमातीचा वापर सुरू असताना शिरडशहापूर व परिसरातील नागरिकांनी महसूल प्रशासन व तहसीलदार वसमत यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली; परंतु प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही.
पोत्रा येथे वादळी वाºयासह पाऊस; वीज पडून गाय ठार, शेतकºयांची धावपळ
पोत्रा : परिसरात आज ११ फेब्रुवारी २०१८ रोजी रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान आलेल्या वादळी वाºयासह विजेत्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यामये विजेच्या कडाक्यात एका शेतकºयाची गाय दगावली. तसेच वादळी वाºयाने गव्हाचे पीक आडवे झाले.
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पोत्रा परिसरात बोल्डा, येहळेगाव गवळी, सिंदगीसह अन्य गावात विजेचा कडकडाट चालू होता. त्यानंतर वादळी वाºयाने वेग घेवून अवकाळी पाऊस पडण्यास सुरूवात झाली. पोत्रा शिवारात साधारण पाऊस असला तरी विजेचा गडगडात जोरात चालू होता. या विजेच्या कडाक्यात पोत्रा येथील रहिवासी असलेले विठ्ठल माधवराव पतंगे हे आपल्या शेतात कडुलिंबाच्या झाडाखाली बैलजोडी, दोन गायी बांधून त्यास चारा टाकून घरी परतले असता साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान कडुलिंबाच्या अर्ध्या झाडावर विज कोसळली. या विजेच्या तडाक्यात गायीला तडाखा बसला. या तडाक्यात गाय जाग्यावरच ठार झाली. या झाडाखाली बैलजोडी, गाय इतर जनावरे होते. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
गाय दगावल्याने सदर शेतकºयांचे जवळपास साठ हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयामुळे शेतकºयांची चांगलीच धांदल उडाली आहे. नुकतेच गहू पिकांची शेवटच्या टप्यातील अवस्था होती. नुकतेच काढण्यास आले आहेत. परंतु वादळी वाºयाने पिके आडवी पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिसरात अनेक शेतकºयाने तुरीचे पिके कापून ठेवली होती. वाळत असताना त्या पिकाचे ढिगारे घालून त्यावर कापड झाकण्यासाठी धावपळ करीत होते.
सेनगावात पाऊस; बन-बरडा परिसरात गारपीट
४सेनगाव : शहरासह तालुक्यातील सर्व भागात रविवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी नऊच्या सुमारास जोरदार अर्धा तास तर सायंकाळी पाचच्या सुमारास तुरळक गारपीटही झाली. तालुक्यातील सर्व परिसरातील रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणात जोरदार अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील बन बरडा परिसरात गारांचा पाऊस झाला. पावसाने दोन सत्रात तालुक्यात हजेरी लावली. सायंकाळी अर्धातास गारांसह पाऊस झाला. या पावसाने तुरीसह हरभरा, गहू, पिकांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसाने शेतकºयांची मोठी तांराबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत गडद ढगाळ वातावरण कायम होते.
वीज अंगावर पडल्याने इसम जखमी; गायीचे वासरू ठार
हिंगोली : तालुक्यातील इंचा येथे घरासमोर असलेल्या झाडावर वीज पडून एक गायीचे वासरु ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली.
जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. रविवारी तर सकाळपासूनच बहुतांश भागात पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. इंचा येथे घराच्या समोर असलेल्या झाडाला गायीचे वासरु बांधले होते. त्यावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर जवळच असलेल्या नागसेन हरिभाऊ तपासे (२९) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून, परिसरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता.
बासंबा परिसरातील पिकांचे नुकसान
४बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा, भिरडा, पाऊस, येळी, पिंपरखेड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये गहू, हरभरा, करडई पिकांचे मोठे नुकसान झाले. तोंडचा घास हिरावल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.