हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत बेवडे जास्तच झिंगाट... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:14 AM2018-07-19T01:14:37+5:302018-07-19T01:15:13+5:30
गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गतवर्षी नोटाबंदी, दुष्काळी परिस्थिती, दारू व बारवर आलेले न्यायालय निर्णयाचे गंडांतर यामुळे मद्यविक्री घटली होती. मात्र या सर्वच परिस्थितीत सुधारणा झाली म्हणून की काय यंदा विदेशी दारू व बीअर विक्रीत तब्बल ७५ टक्क्यांची झिंगाट वाढ झाल्याचे चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यात २0१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यातील मद्यविक्रीची तुलना यंदाच्या वर्षातील या महिन्याशी केल्यास हा फरक स्पष्टपणे जाणवतो. गतवर्षी एप्रिलमध्ये देशी दारूची विक्री २.७८ लाख तर यंदा ३.४६ लाख बल्क लिटर विक्री झाली. मेमध्ये ३.३३ हून ३.३९ लाख तर जूनमध्ये ३.२२ लाखहून ३.३१ लाख लिटरवर गेल्याचे चित्र आहे. या तीन महिन्यांत ८४ हजार ११४ बल्कलिटर जास्त दारू विकली गेली. विदेशी दारू गतवर्षी एप्रिलला २७ हजार तर यंदा ५८ हजार मेमध्ये गतवर्षी ३६८९५ तर यंदा ५८५८८, जूनमध्ये गतवर्षी ३४२३५ तर यंदा ५५७0६ बल्कलिटर दारूची विक्री झाली आहे. विदेशी दारूच्या विक्रीत तुलनेने तब्बल ७५.४९ टक्क्यांनी वाढ झाली. ७४२३८ लिटर दारूची जास्त मागणी झाली आहे.
बीअरच्या बाबतीतही असेच चित्र आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४८0२६ तर यंदा ९६८७१, मेमध्ये गतवर्षी ६४१८८ तर यंदा १ लाख ७ हजार २९७, जूनमध्ये गतवर्षी ४११८६ तर यंदा ६३१९0 बल्क लिटरची विक्री झाली आहे. बीअरची विक्री तर तब्बल १ लाख १३ हजार ९५८ लिटरने वाढली असून प्रमाण ७४.२९ टक्के आहे.
वाईनलाही मागणी
एकीकडे विदेशी व बीअर ढोसणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना वाईन पिणारेही वाढल्याचे दिसत आहे. गतवर्षी तीन महिन्यांत १५0 तर यंदा ९१४ बल्कलिटर वाईन विकली गेली. विक्री वाढीचे हे प्रमाण तब्बल ५0९ टक्के आहे. कमी खर्चिक प्रकाराकडेही काही वळल्याचे दिसते.
२.७३ लाख लिटरने विक्री वाढली
या सर्व प्रकारात २.७३ लाख बल्क लिटरने मद्यविक्री वाढली आहे. देशीची एकूण विक्री १0.१८ लाख, विदेशीची १.७२ लाख, बीअरची १.१३ लाख तर वाईनची ९१४ बल्क लिटर एवढी विक्री झाली.
---
२९ ठिकाणी छापे
हिंगोली जिल्ह्यात अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये १५ ठिकाणी आरोपींसह मुद्देमाल मिळाला. मात्र १४ प्रकरणांत बेवारस मुद्देमाल म्हणून कारवाई झाली. यामध्ये रसायन ३0 लिटर, देशी दारू १00.७ लिटर, विदेशी दारू १२.९८ लिटर तर बिअर २.२६ लिटर जप्त करण्यात आली. याची किंमत ३२ हजार ९८४ रुपये आहे. या कारवाईदरम्यान ६५ हजार रुपये किमतीची दोन वाहनेही उत्पादनच्या पथकाने जप्त केली आहेत.