हिंगोली जिल्ह्यास गारपीट अन् अवकाळीचा फटका, शेतीचे मोठे नुकसान
By विजय पाटील | Published: March 18, 2023 06:36 PM2023-03-18T18:36:44+5:302023-03-18T18:37:06+5:30
हिंगोली जिल्हा परिसरातील अनेक गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली
हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी तीन तालुक्यांतील काही गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले.
या गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आंबा, संत्रा, मोसंबी, केळी, गहू, हरभरा या पिकांची नासाडी झाली. तर काही ठिकाणी काढणीतील हळदीलाही फटका बसला. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
हिंगोली तालुक्यातील सवड, दाटेगाव, लोहगाव या परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास गारपीट व अवकाळी पाऊस पडला. तर डिग्रस कऱ्हाळे, हिंगोली व परिसरातील अनेक गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये काही ठिकाणी तर नालेही वाहते झाले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील माळधामणी, सेलसुरा, वाकोडी, बाभळी, गौळ बाजार, गांगापूर परिसरात गारपीट झाली. या भागात पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दांडेगाव, आखाडा बाळापूर परिसरातही पावसाने हजेरी लावली. वसमत शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस पडला. यामुळे गहू व हरभरा पिकाला फटका बसला. औंढ्यात दहा ते पंधरा मिनिटे गारपीट झाली. तर जवळा बाजार, वगरवाडी, नागेशवाडी परिसरातही पावसाने हजेरी लावली.
हिंगोली तालुक्यातील सवड, दाटेगाव, लोहगाव परिसरात गारपीट झाली. तर डिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, भांडेगाव, बळसोंड, सावरखेडा, बासंबा परिसरात पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, खुडज परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.