हळदीच्या भावात एक हजाराची घसरण; शेतकऱ्यांची निराशा
By रमेश वाबळे | Published: June 7, 2024 07:28 PM2024-06-07T19:28:25+5:302024-06-07T19:29:24+5:30
मार्केट यार्डात १८५० क्विंटलची आवक
हिंगोली : मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात एप्रिल, मे मध्ये सरासरी १६ हजार ५०० रुपयांवर पोहोचलेल्या हळदीच्या दरात ७ जूनला एक हजार रुपयांची घसरण झाली. या दिवशी एक हजार ८५० क्विंटलची आवक झाली होती, तर सरासरी १४ हजार ६०० रुपये भाव मिळाला.
संत नामदेव मार्केट यार्डात सहा दिवसांच्या बंदनंतर ७ जूनला हळदीचे बीट झाले. शेतकऱ्यांनी बीट आणि मोजमाप लवकर व्हावे, यासाठी आदल्या दिवशी ६ जूनला शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड गाठले होते. सहा दिवसांनंतर मार्केट यार्ड सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना भाववाढीची आशा होती. मात्र, क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांनी भावात घसरण होऊन किमान १३ हजार ३०० ते जास्तीतजास्त १५ हजार ९०० रुपयांपर्यंत हळद विक्री झाली. गत आठवड्याच्या तुलनेत भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.
एप्रिल आणि मे मध्ये सरासरी भाव १६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले होते, तर जास्तीतजास्त १८ हजारांपर्यंत हळदीला भाव मिळाला होता. परंतु, भावात आणखी वाढ होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली होती. परंतु, आता भावात घसरण होत आहे.
भुईमुगाची आवक वाढली...
जिल्ह्यातील बहुतांश भागातील भुईमूग काढणीचे काम आटोपले असून, शेतकरी आता भुईमूग शेंगा मोंढ्यात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली आहे. ७ जूनला एक हजार ३५० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला होता. किमान ५ हजार ५०० ते कमाल ५ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर सरासरी ५ हजार ७०० रुपये भाव राहिला. दरम्यान, भुईमूग तेलाच्या वाढत्या दराचा विचार केल्यास यंदा भुईमूग शेंगांना कमी भाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
३६१ क्विंटल हरभऱ्याची आवक...
मोंढ्यात गत आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक मंदावली आहे. सरासरी ५०० ते ६०० क्विंटलची आवक होत होती. शुक्रवारी मात्र ३६१ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. आवक मंदावली तरी भाव मात्र पूर्वीएवढेच आहेत. सध्या ६ हजार १६० ते ६ हजार ५४५ रुपयांचा भाव मिळत आहे.