हिंगोलीत क्षयरूग्ण शोधण्यासाठी ‘घर चलो मोहीम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:36 PM2017-12-14T23:36:21+5:302017-12-14T23:36:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत औषधोपचारासाठी ‘घर चलो मोहीम’ राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १६ पेक्षा अधिक क्षयरोगी रूग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी दिली.
क्षयरोगाविषयी समाजात अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. अजूनही क्षयरोगाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी रूग्णांच्या नियमित औषधोपचारांबरोबरच अधिक जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे क्षयरोग बाधित रुग्ण अर्धवट उपचार घेतात. त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. त्यामुळे क्षय रूग्णांनी डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. शिवाय या रुग्णांना सकस आहार मिळणे महत्त्वाचे आहे.
मोहिमेत मोफत तपासणी- संशयित रुग्णांची थुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी मोफत केली जात आहे. त्यामुळे ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी होणे, थुंकी वाटे रक्त पडणे इत्यादी आढळून येणाºया व्यक्तींनी या मोहिमेमध्ये मोफत थुंकी तपासणीसाठी जवळच्या रूग्णालयात तपासणी करून घ्यावी. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जात आहेत.
सुधारीत राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम २०१७ बाबत आढावा बैठक पार पडली.
सदर बैठकीत जिल्हाधिकाºयांनी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाºयांना शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मोहीम राबविली जात आहे.
जोखीमग्रस्त गावांतील भागाकडे विशेष लक्ष
मोहिमेमध्ये झोपडपट्टी, उसतोड मजूर, विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम मजूर, निराधार, निराश्रित, अनाथाश्रमे, वृद्धाश्रमे, स्थलांतरीत, नॅको तर्फे निवडलेली जोखीमग्रस्त गावांतील अतिजोखमीच्या भागामध्ये सर्व्हे होणार आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात १ लाख १३ हजार ३४५ जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी जावून केला जात आहे. संशयीत क्षयरुग्णांची तपासणी आवश्यकता असल्यास सीबीनॅट मशीनद्वारे केली जात आहे.