‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात हिंगोली आगार विभागात प्रथम

By रमेश वाबळे | Published: November 28, 2023 05:30 PM2023-11-28T17:30:49+5:302023-11-28T17:33:32+5:30

विभागीय पथकाकडून दोन वेळा झाली होती तपासणी

Hingoli First in state transport division in 'Clean and Beautiful Bus Station' campaign | ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात हिंगोली आगार विभागात प्रथम

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात हिंगोली आगार विभागात प्रथम

हिंगोली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात हिंगोली आगाराने विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या अभियानाअंतर्गत विभागीय पथकाकडून दोन वेळा बसस्थानकातील स्वच्छतेसह प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची तपासणी करण्यात आली होती.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत मूल्यांकन करण्यात येते. दर तीन महिन्याला या अभियानाअंतर्गत तपासणी होते. सप्टेंबर महिन्यात विभागीय पथकाकडून ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, तसेच परभणी जिल्ह्यातील परभणीसह जिंतूर, गंगाखेड, पाथरी या आगाराअंतर्गत बसस्थानक, बसस्थानकाचा परिसर, एसटी बसची स्वच्छता, प्रसाधनगृह, तसेच बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोयी- सुविधा उपलब्ध आहेत की नाही? याची तपासणी करण्यात आली होती. यासाठी १०० गुण देण्यात आले होते. त्यापैकी हिंगोली आगाराला ७० गुण मिळाले असून, स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात या आगाराचा प्रथम क्रमांक आला आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन मूल्यांकन झाले असून, अजूनही दोन मूल्यांकन बाकी आहेत. त्यानंतर आगारांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे...
कोणत्याही कामासाठी टीमवर्क महत्त्वाचे असते. हिंगोली आगारातील कर्मचारी, चालक, वाहकांनीही एकत्र येऊन बसस्थानक, एसटी बस स्वच्छतेकडे लक्ष दिले. त्यामुळे आठ आगारांत हिंगोलीचा प्रथम क्रमांक आला आहे.
- सूर्यकांत थोरबोले, आगारप्रमुख, हिंगोली

स्वच्छतेला आणखी प्राधान्य देणार...
हिंगोली एसटी आगाराने स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात आठ आगारांत सर्वप्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी आगारातील कर्मचारी, चालक, वाहकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. यापुढेही स्वच्छतेसह प्रवाशांना सोयी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल.
- एफ.एम.शेख, वाहतूक निरीक्षक, हिंगोली

Web Title: Hingoli First in state transport division in 'Clean and Beautiful Bus Station' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.