हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:17 AM2018-05-10T01:17:29+5:302018-05-10T01:17:29+5:30
येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिमुकल्यांना स्तनपान देता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्षाची स्थापना केली. परंतु अनेक कक्ष सुविधेअभावी दुर्लक्षित होत चालले आहेत. हिंगोली येथील हिरकणी कक्ष तर तब्बल पाच वर्षांपासून बंद अवस्थेतच आहे. सध्या उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे हिंगोली बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे चित्र आहे. परंतु येथील हिरकणी कक्ष कुलुप बंद असल्याने मातांनी स्तनपानासाठी आता जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे मागील दिड वर्षांपासून स्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे हिंगोली बसस्थानक असुविधांचे माहेरघर बनत चालले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीही लक्ष देण्यास तयार नाहीत.
सुविधा केली जाईल- आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांची बदली झाल्याने आता बी. बी. झरीकर यांच्याकडे हिंगोली आगाराचा प्रभार देण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाची प्रक्रीया अंतीम टप्यात असून कामास प्रारंभ होणार आहे. तात्पुरती सुविधा म्हणून कक्षाची सुविधा केली जाईल, असे आगारप्रमुख बोरीकर यांनी सांगितले.