हिंगोलीत आतापासूनच निवडणुकांसारखे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:55 PM2017-12-01T23:55:11+5:302017-12-01T23:55:14+5:30

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच काळ बाकी आहे. मात्र त्यादृष्टीने आतापासूनच रणनीति आखली जात असून त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. आमदारांची अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, स्टेजवरच होणारी शाब्दीक चकमक, बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीतील घटना याचाच एक भाग आहेत.

Hingoli has already got an atmosphere like elections | हिंगोलीत आतापासूनच निवडणुकांसारखे वातावरण

हिंगोलीत आतापासूनच निवडणुकांसारखे वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय स्पर्धकांत चढाओढ वाढली : राजकीय डावपेच आखतांना रंगतोय कलगीतुरा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच काळ बाकी आहे. मात्र त्यादृष्टीने आतापासूनच रणनीति आखली जात असून त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. आमदारांची अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, स्टेजवरच होणारी शाब्दीक चकमक, बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीतील घटना याचाच एक भाग आहेत.
दीपावलीनंतर एकदमच हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील हालचालींची गती तेज झाली अन् नूरही पालटला आहे. खेळीमेळीच्या वातावरणाला आता स्पर्धा, इर्षा अन् खुन्नस या बाबींची किनार दिसू लागली आहे. बाजार समिती पदाधिकारी निवडीपासूनच याची झलक पहायला मिळत आहे. वसमतला तर दिवाळीपूर्वीच बाजार समिती निवडीवरून महाभारत घडले. राष्ट्रवादीतील गट-तटांना शिवसेनेने बळ दिले. त्यामुळे पक्षाची शकले तर पडली. मात्र कशीतरी माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर या नावाभोवती ही मंडळी सध्या चिटकून आहे. कधी संधी मिळेल आणि स्फोट होईल, हे सांगता येत नाही. तर दुसरीकडे सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा यांना लोकसभेची संधी मिळाली तर आपल्याला विधानसभेचा गड लढता येईल का? याची चाचपणी काहीजण करीत आहेत. भाजपच्या लोकांना मात्र आपला नेता वसमतपेक्षा दिल्लीतच जास्त राहात असल्याची चिंता लोकांसमोर व्यक्त करण्यातच हैराण व्हावे लागत आहे.
हिंगोलीत मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झाली. मागच्या जि.प. व पं.स. निवडणुकीत खा.राजीव सातव व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गट-तटाचे राजकारण स्पष्टपणे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीवाल्यांचे मनसुबे वाढले. वेगळे लढलो तर ठीक अन्यथा आघाडी झाली तरीही ही जागा राकाँला सुटेल, या आशेवर आ.रामराव वडकुते कामाला लागले आहेत. तर मागची विधानसभा राकाँकडून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी लढली होती. या दोघांच्या कार्यकर्त्यांत व त्यांच्या रुपाने या दोघांत संघर्ष उभा राहात असल्याचे आता तर सार्वजनिक ठिकाणीही निदर्शनास येत आहे. यापूर्वी बंद खोलीत होणाºया चर्चा आता चव्हाट्यावर येत आहेत. तर हिंगोलीत शिवसेना व भाजपचा संघर्ष सर्वश्रुत आहे. बाजार समितीत तो चव्हाट्यावर येईल, असे वाटत असतानाच सेनेने भाजपला शरण जाणेच पसंत केले. मात्र आ.मुटकुळे आणि सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यातील तेढ कायमच दिसते. हे दोन पक्ष एकत्र लढो की वेगळे याचा परिणाम कुठेतरी दिसणारच आहे.
हिंगोलीचे पडसाद कळमनुरीतही उमटत आहेत. विद्यमान आ.डॉ.संतोष टारफे हे एकदम सरळ स्वभावाचे. गावोगाव अवैध धंदे, दारूमुळे महिलांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडताच त्याचे राजकारण झाले. इतर आमदार यात सहभागी झाले अन् त्यामुळे मोहीम तर सुरू झाली मात्र ती फायद्याची की तोट्याची हा प्रश्नच आहे. याच ठिकाणी शिवसेनेचे संतोष बांगर व आता भाजपवासी झालेले माजी आ.गजानन घुगे यांच्यातील संघर्षही मागील काही दिवसांपासून स्पष्टपणे दिसून येत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी तेवढी उघडपणे रणांगणात येणे बाकी आहे.
हे सगळे सुरू असले तरीही अजून लोकसभेलाच दीड वर्षांचा काळ असल्याचे कोणीही लक्षात घेत नाही. तर राज्य स्तरावर सत्ताधाºयांतील वादामुळे मध्यावधीच होणार की काय? असे वातावरण कायम राहात असल्याने तर ऐनवेळी तयारी नको म्हणून सगळेच कामाला लागत आहेत. त्यातून मतदारसंघातील घिरट्या, भेटी-गाठी इतक्या वाढल्या की जनताही चक्रावली आहे.

Web Title: Hingoli has already got an atmosphere like elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.