हिंगोलीत कयाधू, आसना नदीला पूर तर औंढा तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:54 PM2018-06-23T12:54:01+5:302018-06-23T13:02:29+5:30
शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारी सकाळी थांबली.
हिंगोली : शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारी सकाळी थांबली. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली असून ४७ मिमी पावसाची नोंद झाली. औंढा तालुक्यात अतिवृष्टी झाली. कयाधू, आसना नदी दुथडी भरून वाहिली.
हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसांची ओढ दिल्यानंतर अतिवृष्टीचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. काल रात्रीपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर काही भागात पाऊस थांबला. मात्र वसमत, सेनगाव, औंढा तालुक्यात पहाटेपर्यंत संततधार सुरूच होती. यामुळे वसमत व औंढा तालुक्यातील अनेक ओढे, नाल्यांना पूर आला होता. हट्टा परिसरात तर सगळे नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे आसना नदीला पूर आला होता. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहात होते.
वसमत तालुक्यातही हट्टा, औंढा तालुक्यात येहळेगाव परिसरात हेच चित्र होते. हट्ट्यात १३२ तर येहळेगाव मंडळात १५२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर औंढा ९८, हिंगोली-७५, माळहिवरा-६९ मिमी अशी पाच मंडळात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरुप आले. तर ओढ्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनीही खरडल्या आहेत.
जिल्ह्यात मंडळनिहाय पाऊस
हिंगोली तालुक्यात ७५ मिमी, खांबाळा ५२ मिमी, माळहिवरा ६९ मिमी, सिरसम बु. ४८ मिमी, बासंबा ६५ मिमी, नर्सी नामदेव ५६ मिमी, डिग्रस क-हाळे ३७ मिमी, तर कळमनुरी ४१ मिमी, नांदापूर ४५ मिमी, आखाडा बाळापूर २५ मिमी, डोंगरकडा ८ मिमी, वारंगा फाटा १६ मिमी, सेनगाव २४ मिमी, गोरेगाव ६२मिमी, आजेगाव १५ मिमी, साखरा ३६ मिमी, पानकनेरगाव १६ मिमी, हत्ता १२ मिमी, तर वसमत २२ मिमी, हट्टा १३४ मिमी, गिरगाव २ मिमी, कुरुंदा ३५ मिमी, टेंभुर्णी १५ मिमी, आंबा २१ मिमी, औंढा नागनाथ ९८ मिमी, जवळा बाजार ५५ मिमी, यहळेगाव १५२ मिमी, साळणा ४८ मिमी असे एकूण ४७. ८९ एवढा सरासरी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.