हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी
By विजय पाटील | Published: June 4, 2024 09:22 PM2024-06-04T21:22:16+5:302024-06-04T21:22:55+5:30
Hingoli Lok Sabha Result 2024:हिंगोली मतदारसंघ कायम परिवर्तनाच्या दिशेने जातो, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले
Hingoli Lok Sabha Result 2024: हिंगोली : लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाचे नागेश पाटील आष्टीकर हे २४ व्या फेरीअखेर ४ लाख ८७ हजार ६०७ मते घेवून १ लाख ७ हजार ५१७ मतांच्या आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे सेनेच्या बाबूराव कदम यांनी ३ लाख ८० हजार ९० मते घेतली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बी.डी. चव्हाण हे १ लाख ६० हजार ४४१ मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. हिंगोली मतदारसंघ कायम परिवर्तनाच्या दिशेने जातो. त्यानुसार या मतदारसंघात शिंदे गटाचे बाबूराव कदम यांना आधीच धोका जाणवत होता. त्यातच विद्यमान खा.हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी बहाल केल्याने आणखीच वातावरण बिकट झाले होते.
सुरुवातीपासूनच भाजपची मंडळी शिंदे सेनेला येथे उमेदवारी देवू नका, अशी भूमिका घेताना दिसत होता. त्यामुळे त्यांनी मोदींच्या चारशे पारचा नारा बाद करून ३९९ असा केला होता. हा नारा कुचकामी ठरला हा भाग अलहिदा मात्र त्याचाही फटका कदम यांना बसला. शिवाय मराठा आरक्षण, मुस्लिम समाजाची भाजपवरील नाराजी, दलित समाजातील संविधान बचावचा नारा अशा अनेक फॅक्टरसह महागाई, शेतीमालाचे पडलेले भाव व बेरोजगारी हे मुद्देही तेवढेच तीव्र होते. याचा एकत्रित परिणाम घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीने एकजूट दाखविल्याने आष्टीकर यांचा विजय सुकर झाला.
नागेश पाटील आष्टीकर - 4 लाख 92 हजार 535
बाबुराव कदम - 3 लाख 83 हजार 933
बी.डी.चव्हाण- 1 लाख 61 हजार 814
नागेश पाटील आष्टीकर हे 1 लाख 08 हजार 602 मतांनी विजयी