‘माझी वसुंधरा’ उपक्रमात हिंगोली पालिका राज्यात अव्वल; मिळाले ५ कोटींचे पहिले बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 03:26 PM2021-06-05T15:26:05+5:302021-06-05T15:26:27+5:30
हिंगोली नगरपालिकेला यापूर्वी स्वच्छता अभियानातील विविध स्वरुपाचे तीन पारितोषिके मिळाली आहेत.
हिंगोली : नगरपालिकेने स्वच्छता अभियानासोबतच वनराजी, प्रदूषण नियंत्रण आदी बाबींमध्ये केलेल्या कामाचे फळ आता मिळत असून यंदाचा माझी वसुंधरा उपक्रमाचा राज्यस्तरीय पहिला पुरस्कार आज ऑनलाईन मिळाला. यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, संजय सोनवणे, सचिव मनीषा म्हैसेकर आदींची उपस्थिती होती. राज्यातील २२२ नगरपालिकांनी या अभियानात सहभाग नोंदविला होता. त्यातून पहिले बक्षीस पटकावण्याची किमया हिंगोली पालिकेने साधली आहे.
हिंगोली नगरपालिकेला यापूर्वी स्वच्छता अभियानातील विविध स्वरुपाचे तीन पारितोषिके मिळाली. घरकुल योजनेतही पुरस्काराचा मानकरी ठरली. यात आता माझी वसुंधरा अभियानात प्रथम आल्याने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, नगरसेवक बिरजू यादव, आरेफ लाला, चंदू लव्हाळे, श्याम माळवटकर, स.सनोबर, बाळू बांगर, ठाकूर यांच्यासह न.प.चे कर्मचारी हजर होते.
फटाके फोडून जल्लोष
हिंगोली पालिकेला राज्यस्तरीय पहिले बक्षीस जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बांगर, चव्हाण, कुरवाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मागील चार ते पाच वर्षांत झालेल्या विविध कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यातच इतर उपक्रमांमध्येही पालिका मागे नाही. त्यामुळे विविध प्रकारची बक्षीसे दरवर्षी मिळत आहेत. त्यामुळे विकासालाही हातभार लागत आहे. काही बक्षीसांमध्ये निधीही असल्याने त्याचा शहराच्या विकासासाठी उपयोग होत असल्याचे बांगर व चव्हाण यांनी सांगितले.