आता चर्चा पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 11:38 AM2023-04-04T11:38:44+5:302023-04-04T11:38:56+5:30
अंधश्रद्धा नाही; योगाचा आधार असल्याचा दावा
हिंगोली: तालुक्यातील धोत्रा येथे हरिनाम व संगीत भागवत सप्ताहासाठी ग्रामस्थांनी हभप हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना यंदा पाचारण केले. हे बाबा रोज कीर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग दाखवितात. कीर्तनापेक्षा जास्त गर्दी यालाच होत असून लोक दाटीवाटीने विहिरीवर जमताना दिसत आहेत.
धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची ६ एप्रिलला सांगता आहे. हरिभाऊ महाराज व त्यांची पत्नी सुमनबाई यासाठी ज्ञानेश्वरीचे प्रवचन करायला आले आहेत. मात्र हरिभाऊ रोज शेत शिवारात जाऊन विहिरीतील पाण्यावर तरंगून मंत्रोच्चार करतात. तर बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात, असे भक्त सांगत होते.
शिवाजी कनिराम जाधव यांच्या शेतातील विहिरीवर हरी महाराज यांनी पाण्यावर तरंगून राहण्याचा प्रयोग करून दाखविला. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. वेद व ग्रंथ वाचनामुळे मला ही विद्या प्राप्त झाल्याचे हरिभाऊ महाराज सांगतात. त्याला योगाचाही आधार असल्याचे म्हणतात. मात्र यातून ते लोकांना फसवण्यासाठी किंवा अंधश्रद्धेची बीजे रोवण्यासाठी काही करीत नसले तरीही भाविक मात्र कामधंदे सोडून हा प्रयोग पाहत आहेत. हात जोडून उभे राहणारे भक्त गर्दी वाढताच चलबिचल करत होते. ही गर्दी इतर दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू नये, याची काळजी ग्रामस्थांनीच घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी याबाबतचे काढलेले व्हिडीओही परिसरात व्हायरल होत असून यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंधश्रद्धा नाही; योगाचा आधार
शिवाजी कनिराम जाधव यांच्या शेतातील विहिरीवर हरिभाऊ महाराज यांनी पाण्यावर तरंगत राहण्याचा प्रयोग करून दाखविला. वेद व ग्रंथ वाचनामुळे ही विद्या प्राप्त महाराज सांगतात. यातून ते लोकांना फसविण्यासाठी किंवा अंधश्रद्धेची बीजे रोवण्यासाठी काही करीत नसले तरीही लोकांमध्ये त्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
महाराजांचा प्रयोग पाहण्यास आलो
त्यांच्या वडिलांपासून ही परंपरा त्यांनी जपली आहे. योगिक क्रियेमुळे त्यांना हे शक्य आहे. हे पाहण्यासाठी त्यांची भाविक मंडळी येथे जमली आहे. मीही त्यांच्याप्रमाणेच येथे आल्याचे शिक्षक असलेल्या मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले.