हिंगोली पं.स.च्या प्रभारी सभापती जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:03 AM2018-07-08T00:03:54+5:302018-07-08T00:04:13+5:30
सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आहे.
हिंगोली पंचायत समितीत राजकीय करारानुसार सेनेचे सभापती विलास मानमोठे व काँग्रेसच्या उपसभापती कावेरी कºहाळे यांनी राजीनामा दिला. आता काँग्रेसकडे सभापती व सेनेकडे उपसभापतीपद जाणार आहे. मात्र सध्याच्या रिक्त पदाच्या काळात पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार देण्यासाठी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, उपमुकाअ नितीन दाताळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष व चार सभापतींच्या नावे चिठ्ठी टाकून निवड केली. यात रेणूका जाधव यांचे नाव निघाल्याने त्यांना पदभार देण्यात आला आहे. यानंतर मान्यवर व सदस्यांनी जाधव यांचा सत्कार केला.
१८ रोजी पं.स.त पदाधिकारी निवडीची सभा
हिंगोली पंचायत समितीत नवीन सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची उपस्थिती राहणार आहे. यात सकाळी १0 ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तर दुपारी २ वाजता सभेला प्रारंभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम घोषित केला आहे.