Hingoli: वाळू माफियांचा उच्छाद! भरधाव टिप्परने चिरडल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: March 21, 2025 17:35 IST2025-03-21T17:33:01+5:302025-03-21T17:35:29+5:30
Hingoli News: आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता.

Hingoli: वाळू माफियांचा उच्छाद! भरधाव टिप्परने चिरडल्याने नवरदेवाचा जागीच मृत्यू
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली): वाळूने भरलेले भरधाव वेगातील टिप्पर नवरदेवाच्या अंगावर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील चौकात घडली. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील गणेश उत्तम तनपुरे (वय २५) याचे २४ मार्च रोजी लग्न होणार होते. २१ मार्च रोजी घरी देवकार्य असल्याने आपल्या आजोबाला आणण्यासाठी तो दुचाकीवरून सकाळी पावणेसहा वाजेदरम्यान वाघजाळीकडे निघाला होता. दरम्यान, आजेगाव येथील चौकात पाठीमागून भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या टिप्परने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असून गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्परचालक वाळू तिथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाला. मृतदेह विच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. परंतु आरोपीस अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयताच्या नातेवाइकांकडून घेण्यात आला होता.
तासभर रास्ता रोको; आरोपी अटक...
वाळूच्या टिप्परसह आरोपीला तात्काळ अटक करून योग्य कारवाईच्या मागणीसाठी गोरेगाव पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर पेटवून देत माजी आ. संतोष टारपे, संदेश देशमुख, शेतकरी नेते गजानन पाटील, नामदेव पतंगे, बी. आर. नायक, नगरसेवक निखिल देशमुख, नातेवाइकांनी रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक विनोद झळके यांनी दोन तासांत आरोपीस अटक केली.
वाळू वाहतुकीचा उच्छाद...
अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील गोरेगाव येथे दाखल झाल्या. यावेळी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक शिवसांभ घेवारे हे गोरेगाव येथे दाखल झाले. यावेळी संदेश देशमुख व गजानन कावरखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली.