हिंगोलीत दरदिवशी ५१ मे. टन कचºयाचे व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:56 PM2017-12-05T23:56:25+5:302017-12-05T23:56:34+5:30
शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात असले तरी, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एकट्या हिंगोली शहरात दरदिवशी जवळपास ५१ मेट्रिक टन घनकचरा जमा होतो. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून आता प्रत्येक वार्डात समतादूत नेमले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात असले तरी, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एकट्या हिंगोली शहरात दरदिवशी जवळपास ५१ मेट्रिक टन घनकचरा जमा होतो. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून आता प्रत्येक वार्डात समतादूत नेमले जाणार आहेत. शिवाय ओला व सुका कचºयासाठी नवीन २० घंटागाडी शहरातून फिरणार आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे घनकचºयाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील कचºयाच्या व्यवस्थापनासाठी पालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ व सुंदर शहरासाठी नियोजन केले आहे. हिंगोली शहरात दरदिवशी ५१ मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यापैकी ३८ टक्के हा सुका कचरा असून आता कचºयांचे वर्गीकरण केले जाणार आहे. हिंगोली तालुक्यातील राहुली खु. येथे हिंगोली शहरातील कचरा जमा केला जातो. या ठिकाणी विड्रो कंपोस्टिंग केली जाणार आहे. प्लास्टिक कचºयापासून कोळसा तयार करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तर ओल्या कचºयापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा प्लॅन पालिकेचा आहे. शिवाय हा उपक्रम एका महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात हिंगोली पालिकेने सहभाग घेतला आहे. जवळपास ४ हजार ४१ शहरांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. हिंगोली शहरात किती कचरा जमा होतो, कचºयाचे वर्गीकरण याची माहिती सर्वेक्षणादरम्यान केली जाणार आहे. नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाच्या अभियंता सनोबर यांनी केले. प्रत्यक्ष कृतीशिवाय शहर स्वच्छ बनणार नाही, किंवा पालिकेची कार्यक्षमता वाढवूनही या समस्येचे निराकरण करणे अशक्य आहे, त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांत जनजागृती होणे गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.