हिंगोलीत अकरा लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: February 6, 2017 01:03 PM2017-02-06T13:03:04+5:302017-02-06T13:03:04+5:30
हिंगोली जिल्ह्यातून वाहतूक होत असलेला 11 लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गुटखा तस्करांना मोठा हादरा दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 6 - हिंगोली जिल्ह्यातून वाहतूक होत असलेला 11 लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गुटखा तस्करांना मोठा हादरा दिला. यातील तस्कर हे नांदेड जिल्ह्यातील असून हा माल आंध्र प्रदेशातून आल्याचा संशय आहे.
हिंगोली जिल्ह्यात गुटखाविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अन्न व औषधी प्रशासन मात्र साधी तपासणीही करीत नसल्याने या विक्रीचे स्तोम वाढले आहे. काही ठिकाणी तर स्थानिक स्तरावरच माफियांनी उत्पादन सुरू केल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र अद्याप तशी काही कारवाई झाली नाही. बाहेरून येणा-या गुटख्यामुळे मागील काही दिवसांपासून ओरड मात्र वाढली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाळतीवर होते. त्यात नांदेडहून निघालेला टीएस-0७-व्हीबी-८५६९ हा ट्रक गुटखा घेवून हिंगोलीकडे निघाल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, स्थागुशाचे पोनी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. हा ट्रक हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता परिसरातील वैशाली ढाब्यासमोर येताच रविवारी रात्री ११.३0 च्या सुमारास पोलिसांनी पकडला. यामध्ये तब्बल दहा लाख ८0 हजारांचा गोवा हा गुटखा आढळून आला. १४ लाखांच्या ट्रकसह एकूण २४ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोमवारी याबाबत बालाजी विश्वनाथ वड्डेवाड (रा.नरसी नायगाव), मावधव मारोती बोईनवाड (रा. वारंगवाडी, ता.मुदखेड, जि.नांदेड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात फौजदार सुभान केंद्रे, कर्मचारी शेषराव राठोड, हिदायत अली, शेख मुजीब, गणेश राठोड आदींचा समावेश होता.