हिंगोलीत एकाच कुत्र्यांने घेतला २२ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:35 PM2018-05-15T19:35:03+5:302018-05-15T19:35:03+5:30
तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना सोमवारी (दि. १४) रात्री १० च्या सुमारास घडली.
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना सोमवारी (दि. १४) रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या उकाडा फार जाणवत असल्याने ग्रामस्थ नेहमीप्रमाणे अंगणात झोपले होते. दरम्यान, अचानक पिसाळल्या कुत्र्याने समोर येईल त्याचा चावा घेत धुम ठोकली. गावात आराडा ओरडा झाला. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांना काहीही करता आले नाही. जखमी मध्ये लहान मुलासह वयोवृद्धांचा समावेश आहे. भगवान गुठ्ठे, आनंदराव ठाकरे, शेख रसूल, उत्तम ठोंबरे, शुभम खडसे, अशोक घुगे, द्वारकाबाई गुठ्ठे, पंढरी गुठ्ठे, सुधाकर घुगे, सुरज गुठ्ठे, आंजनबाई ठाकरे, रंजनाबाई इंगोले यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार आहेत. तर काहीवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.
कुत्र्याने अनेकांचे तर लचके तोडले आहेत. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट जरी कुत्रे दिसले तर त्यांना ग्रामस्थ गावाबाहेर पिटाळून लावत आहेत. तर गावात कुठेही कुत्रे दिसले तर मुले घाबरत आहेत.