हिंगोलीत मराठा आरक्षण समर्थनार्थ अज्ञातांची बसवर दगडफेक, पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:02 PM2020-09-10T19:02:09+5:302020-09-10T19:18:16+5:30
'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,' 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत अज्ञातांनी बस पेटविण्याचा प्रयत्न केला
आखाडा बाळापूर : मराठा आरक्षण समर्थनार्थ अज्ञातांनी आखाडा बाळापुर ते हदगाव जाणाऱ्या बसला आडवून दगडफेक करत पेटविण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी यावेळी 'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. बसमधील चालक, वाहक आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही गुरुवारी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथून हदगावकडे दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक बस ( क्रमांक एम. एच. 40 एन 9801) निघाली. यावेळी बसमध्ये १३ प्रवासी होते. बाळापुरपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या देवजना फाट्याजवळ चार ते पाच अज्ञातांनी बस अडवली. एक मराठा-लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत त्यांनी बसवर दगडफेक केली. बसच्या मागील सीटवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. यानंतर ते घोषणा देत तेथून निघून गेले.
वाहक एस.डी.पवार व चालक बी. एन. सुरोसे यांनी प्रसंगावधान राखून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान टळले. बाळापूर पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार सपोनि रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तरुणास उपचारासाठी लातूरला हलविले #marathareservationhttps://t.co/y9NUF2Ppee
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 10, 2020
अज्ञातांचा तपास सुरु
बस अडवल्यानंतर अज्ञातांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा देत दगडफेक केली. बसच्या सीटला आग लावल्यानंतर ते घोषणा देत निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे ठाणेदार रवी हुंडेकर यांनी सांगितले.