हिंगोलीहून नांदेडला रुग्ण पाठविण्याचा सपाटा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:57 PM2018-01-31T23:57:08+5:302018-01-31T23:59:25+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.
संतोष भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने आणि उपचारासाठी सुविधाच नसल्याने रुग्णालयातून अन्यत्र पाठविण्याचा सपाटा लावला आहे. एका वर्षात तब्बल २ हजार २४ रुग्णांना अन्यत्र रेफर केल्याची आकडेवारी रुग्णालयातून मिळाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची दुरुनच टोलेजंग इमारत पाहून रुग्णालयात सर्वच सुविधा असतील, असे वाटते. परंतु दुरुनच डोंगर चांगला म्हणण्याची वेळ आली आहे. आत प्रवेश केल्यानंतर अनुभव येतो तो येथील परिस्थितीचा. या ठिकाणी रुग्णांवर उपचारच होत नसल्याची ओरड नेहमीचीच आहे. परंतु त्याततही भयंकर बाब म्हणजे जराही रुग्ण गंभीर वाटला तर थेट त्या रुग्णांना नांदेडचा मार्ग दाखविला जातो. एवढेच काय तर येथे दिवस रात्री राबत असलेले खाजगी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना येथील स्थिती सांगून रुग्ण पुढील उपचारासाठी हलविण्यासंदर्भात उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करुन डोक्यावरील ओझे कमी करुन घेतात. या ठिकाणी वचक बसण्यायोग्य अधिकारी नसल्याने की काय डॉक्टरांची मानसिकता बदलण्याचे नावच घेत नाही. एखांदा रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचे सोडून त्याच्या चौकशीतच वेळ घालवला जातो. त्यामुळे बरेच रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्याचे टाळतात.
२०० खाटांची अनेक दिवसांपासून तयारी सुरू असली तरीही प्रत्यक्षात १०० खाटावरच काम भागविले जात आहे. इमारतीचे काम सुरु असल्याने ते अजूनही अंतिम टप्प्यात नाही. येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार घेण्यावाचून पर्यायच नाही. त्यातच या ठिकाणी अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलविण्यास सांगितले जाते. याचा आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे.
स्टाफसाठी शौचालय नाही
या ठिकाणी स्टाफसाठी शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने त्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. परिणामी, त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, रात्री अपरात्री गंभीर प्रश्न निर्माण होतो. मध्यंतरी हा प्रश्न सुटला होता. तो पुन्हा सुरु झाला आहे.
रुग्णालयात या सुविधांची नितांत गरज
रुग्णालयामध्ये एखांदा हाडाचा रुग्ण दाखल कारायचा असल्यास त्याला निदान एक ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. परंतु येथे एका - एका वार्डात फक्त ३० ते ३५ खाटा असल्याने त्याला येथे दाखल ठेवणे शक्य नसते. दिवसाकाठी एका- एका वार्डात १०० च्या वर रुग्ण दाखल होतात त्यामुळे मोठी पंचायत निर्माण होते. तसेच या ठिकाणी अतिदक्षता विभागच नसल्याने अपघातातील रुग्ण शक्यतोर सुविधा असलेल्या ठिकाणी रेफर केले जातात. याचबरोबर येथे शस्त्रक्रियासाठी डॉक्टरच नसल्यानेही त्या रुग्णांना नांदेड येथे रेफर करण्याची वेळ येते. सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी अजून किती वर्षांचा कालावधी लागेल? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
औषधींचा तुटवडा
रुग्णालयात औषधीचा तुटवडा हे काय नवीन नाही. या प्रकाराला अनेक महिन्यांपासून रुग्ण तोंड देत आहेत. एवढेच काय तर काही महिन्यांपूर्वी औषधी नसल्याचे लिहूनच ठेवले होते. तर कधी- कधी परिचारिकांना स्वखर्चातून औषधी आणावी लागते.