हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प
By विजय पाटील | Published: June 28, 2024 01:54 PM2024-06-28T13:54:18+5:302024-06-28T13:55:10+5:30
मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावनजीक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची अद्याप कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनाबाबत गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांताराम सावके, के.के. सावके या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून उपोषण सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेत नसल्याने काल शांताराम सावके या शेतकऱ्याने स्वत:ची दुचाकी पेटवून देत निषेध नोंदविला. यामुळे या आंदोलनाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
या आंदोलकांच्या समर्थनार्थ आज हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावपासून एक किमी अंतरावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी टायर जाळून वाहतूक थांबविली होती. चोख पोलिस बंदोबस्तही होता. या आंदोलकांनी सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तर लोकप्रतिनिधीही टक्केवारीची कामे करण्यात मश्गुल असून त्यांना शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यास वेळ नसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अन् शेताला कुंपन करून दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही दिला.
वाहनांच्या रांगा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर टायर जाळलेले असल्याने वाहनांना तेथून रस्ता काढणेही शक्य नाही. शिवाय अनेकांनी तर या वाहनांतून उतरून आंदोलनात सहभाग घेतल्याचेही पहायला मिळाले.