हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:23 AM2018-02-23T00:23:05+5:302018-02-23T00:23:13+5:30
नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणाला? हा प्रश्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणाला? हा प्रश्न आहे.
महावितरणच्या थकबाकीचा कोट्यवधींचा डोंगर नाहीसा करणे हे कोणत्याच नगरपालिका व प्रादेशिक योजनांतील ग्रामपंचायतींना शक्य नाही. मात्र त्यात मार्ग काढून ठरावीक रक्कमेचे हप्ते पाडून परतफेड केल्यास त्यात यश येवू शकते. त्यासाठी हिंगोली पालिकेने तर मंत्र्यांकडे बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी हप्तेही पाडून घेतले. मात्र तेही भरले जात नसल्याचे सांगून महावितरणने वीज तोडली. हीच गत वसमत, कळमनुरी व सेनगावची असून चालू देयकही भरले नसल्याने या सर्वांचीच वीज तोडली आहे. पाणीपुरवठ्यासाठी जशी धडपड केली जात आहे, तशी पथदिव्यांसाठी कोणीच करताना दिसत नसल्याने शहरे अंधारातच आहेत. ग्रामीण भागातही हेच चित्र आहे.
पथदिव्यांचे हिंगोली विभागात १२१ ठिकाणची ११.८३ कोटी, वसमत विभागात २0५ ठिकाणची १२.0९ कोटी, कळमनुरी विभागात १४९ ठिकाणची ११.५३ कोटी, सेनगाव विभागात १३५ ठिकाणची ८.६0 कोटी, औंढा ना. विभागात १४३ ठिकाणची १४.४४ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे या सर्व जोडण्या तोडण्याचा महावितरणचा आदेश आहे. यापैकी सध्या हिंगोलीत ७७, वसमतला २0५, कणमनुरीत १५ ठिकाणची जोडणी तात्पुरती तोडली आहे. यापैकी केवळ वसमतला ७७ जोडण्यांचे १४ लाख जमा झाले.
पाणीपुरवठा योजनांचेही वेगळे चित्र नाही. हिंगोली विभागात ६७ जोडण्यांचे ५0 लाख, वसमत विभागात १४५ जोडण्यांचे ३.६१ कोटी, कळमनुरीत १९१ जोडण्यांचे ५.४१ कोटी, सेनगावात १0८ जोडण्यांचे ४.२१ कोटी तर औंढ्यात १५ जोडण्यांचे २४ लाख थकलेले आहेत. या सर्व जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित केला असून वसमतमध्येच केवळ १४५ पैकी १३७ जोडण्या तोडल्या. ८ जोडण्यांचे ५८ लाख वसूल झाले आहेत.
पथदिव्यांबाबत नगरपालिका व नगरपंचायतीही त्याच रांगेत आहेत. हिंगोलीत १७७ जोडण्यांचे ६.२५ कोटी, वसमतला ७७ जोडण्यांचे ४.१७, कळमनुरीत २३ जोडण्यांचे ४५ लाख, सेनगावात सात लाख तर औंढ्यात १४ जोडण्यांचे १.0४ कोटी थकले आहेत. यात हिंगोलीत ७ लाख, वसमतला १४ लाख भरले आहेत. तर औंढ्यातही काही रक्कम भरली आहे. वसमतला कागदावर पथदिवे बंद असले तरीही प्रत्यक्षात मात्र सुरू आहेत.
हिंगोली शहरातील पथदिवे बंद असल्याने होत असलेली ओरड लक्षात घेता नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, उपअभियंता डी.ई. पिसे आदींची भेट घेतली. तर आता दहा लाख, ६ मार्चला १५ लाख व उर्वरित
रक्कम मार्च एण्डला भरण्याचे आश्वासन दिले. याबाबत अधीक्षक अभियंत्यांशीही चर्चा झाली. मात्र दुपारपर्यंत काहीच तोडगा निघाला नव्हता. सायंकाळपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास नागरिकांनीच आपापल्या घरासमोर दिवे लावावेत, असे आवाहन बांगर यांनी केले.
सध्या कळमनुरी व औंढ्यात पथदिवे सुरू केले आहेत. सेनगाव व हिंगोलीत मात्र पथदिवे बंद आहेत. वसमतला कागदावर बंद आहेत. तर ग्रामीण भागातील बहुतांश पाणीपुरवठा योजना व पथदिवे बंदच आहेत.