हिंगोलीत अतिक्रमण धारकांची पालिका पथकाच्या महिला कर्मचार्यास धक्का-बुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:52 PM2018-01-09T15:52:51+5:302018-01-09T16:29:43+5:30
मुख्यरस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेच्या पथकाने सुरूवात केली. यावेळी अतिक्रमण धारकांनी नगर परिषदेच्या महिला कर्मचार्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे.
हिंगोली : मुख्यरस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेच्या पथकाने सुरूवात केली. यावेळी अतिक्रमण धारकांनी नगर परिषदेच्या महिला कर्मचार्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे.
आज सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील व प्रशासकीय यंत्रणा पोलीस बंदोबस्तासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढत होते. यावेळी अतिक्रमण काढताना काही अतिक्रमणधारकांनी वाद घालत पालिकेच्या महिला कर्मचार्यास धक्काबुक्की केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शहर ठाण्याचे फौजदार तानाजी चेरले यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्यांनी शहर ठाण्याकडे धाव घेतली.
हिंगोली शहरातील नगर परिषद हद्दीतील बिरसा मुंडा चौक, देवडानगर, एनटीसी, औंढारोड, बसस्थानक, महावितरण कार्यालय, इंदिरा गांधीचौक, महेश चौक, महावीर चौक, आंबेडकर चौक, रेल्वेस्टेशन रोड, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, टपाल कार्यालय रोड, अष्टविनायक चौक, खुराणा पेट्रोलपंपाजवळील परिसर, जवाहर रोड, भाजीमंडई, पलटण मस्जीद, अकोला रोड, पिपल्स बँक परिसर, न्यायालयासमोर, पलटण पाण्याची टाकीजवळील, रिसाला नाका व शहरातील मुख्यरस्ता व इतर प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.