‘हिंगोलीत महिला रुग्णालय उभारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:58 AM2018-07-06T00:58:12+5:302018-07-06T00:58:35+5:30
ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले.
हिंगोली शहरात महिला रुग्णालय उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यासाठी जुन्या रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयातही जागा उपलब्ध आहे. केवळ हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात आधीच वसमत येथे महिला रुग्णालय स्थापन झालेले आहे. नुकत्याच झालेल्या डीपीसीच्या बैठकीत वसमतचे रुग्णालय न हलविता हिंगोलीच्या रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीही दिले.
शिंदे यांच्या भागात नुकतेच पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. त्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रस्तावही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
सामान्य रुग्णालयात आधीच विविध विभागांचा ताण आहे. त्यात महिलांच्या प्रसूतीसाठी अनेकदा डॉक्टरच नसते. जर स्वतंत्र महिला रुग्णालय झाले तर ही गैरसोय दूर होणार आहे. शिवाय इतर यंत्रणाही उपलब्ध होणार आहे.