हिंगोलीकरांनी एकता दौडमधून दिला सामाजिक शांततेचा संदेश
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 25, 2023 05:21 PM2023-08-25T17:21:28+5:302023-08-25T17:22:04+5:30
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
हिंगोली : सामाजिक शांतता,सद्भावनेचा संदेश देण्यासाठी व खेळाप्रती समाजात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ५ कि.मी. एकता दौड स्पर्धा घेण्यात आली. यात अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या वेळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील,मुख्याधिकारी अरविंद मुंढे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ.श्रीकांत पाटील, प्रभारी पोलिस उपअधीक्षक सोनाजी आम्ले, स्थागुशा पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, विकास पाटील, शेख आदींची उपस्थिती होती. संत नामदेव पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक- अग्रसेन चौक- जिल्हा परिषद नवीन रोड- पाण्याची टाकी -शिवाजीनगर चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक- पोस्ट ऑफिस चौक- जवाहर रोड - महात्मा गांधी पुतळा चौक मार्गे इंदिरा गांधी पुतळा चौक मार्गे परेड ग्राउंड येथे एकता दौडचा समारोप झाला. एकता दौडमध्ये सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, पोलिस अधिकारी, अंमलदार,सर्व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी,पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, डॉक्टर आदींनी सहभाग नोंदविला.
शिवसांब घेवारे, अतिश चव्हाण, काजल राठोड, योगेश होडगीर ठरले विजेते
या एकता दौड स्पर्धेत खुल्या गटातून अतिश चव्हाण (प्रथम), ओमकार जगताप(द्वितीय), महिला गटातून काजल राठोड (प्रथम) , अंकिता गव्हाणे (द्वितीय) ,पोलिस अंमलदार गटातून पोलिस शिपाई योगेश होडगीर(प्रथम), पोलिस अधिकारी गटातून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे (प्रथम) विजेते ठरले आहेत. विजेत्या स्पर्धेकांना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.