छपरा रेल्वेसाठी हिंगोलीकर एकवटले, तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रोखली
By रमेश वाबळे | Published: November 23, 2022 06:08 PM2022-11-23T18:08:12+5:302022-11-23T18:09:09+5:30
हिंगोलीमार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा- अकोला या रेल्वे मार्गाऐवजी जालनामार्गे वळविण्यात आली.
हिंगोली : छपरा एक्सप्रेस रेल्वे पूर्व नियोजनाप्रमाणे पूर्णा- हिंगोली- अकोला मार्गे सोडावी, वाशीम- हिंगोली- वसमतमार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडी सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर रोजी हिंगोलीकरांच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११ वाजता तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रेल्वेगाडी काही वेळी रोखून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
हिंगोलीमार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा- अकोला या रेल्वे मार्गाऐवजी जालनामार्गे वळविण्यात आली. त्यामुळे हिंगोली- वाशीम मार्गावरील प्रवाशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. छपरा एक्सप्रेस पूर्व नियोजनाप्रमाणे पुर्णा- अकोला मार्गे सोडण्यात यावी, मुंबईला जाणारी रेल्वे गाडी चालू करण्यात यावी तसेच हिंगोली जिल्ह्यातील व्यापार पेठेकरीता अत्यावश्यक असलेले गुड्स शेड तात्काळ उभारण्यात यावेत, या मार्गावरील बंद असलेल्या सर्व पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू सुरू करण्यात याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
सकाळी ८.३० वाजता रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, नागरिक शहरातील महात्मा गांधी चौकात जमले होते. या ठिकाणाहून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला साद देत व्यापाऱ्यांनीही प्रतिष्ठाणे बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदविला. तर सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे स्टेशन गाठत तिरूपती - अमरावती रेल्वे काही वेळ रोखून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी छपरा रेल्वे हिंगोलीमार्गे धावलीच पाहिजे, मुंबईसाठी एक्सप्रेस गाडी मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.