नेहमीच्या वाहतूक कोंडीला हिंगोलीकर वैतागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 07:48 PM2020-03-04T19:48:48+5:302020-03-04T19:49:36+5:30
मुख्य रस्त्यालगतच उभे केली जातात वाहने
हिंगोली : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीसह आता चारचाकी वाहनांनी गराडा घालणे सुरू केले आहे. या खाजगी वाहनांच्या विळख्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहतूक कोंडीच्या कटकटीला मात्र हिंगोलीकर पुरते वैतागून गेले आहेत. अन् पोलीस प्रशासनाकडूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही, हे विशेष.
हिंगोली शहरातील मुख्य असलेल्या श्री अग्रसेन चौक ते इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खाजगी वाहने उभी केली जातात. विशेष म्हणजे शहरातील या मुख्य चौकातील रस्त्यालगत चारचाकी वाहनांनी गराडा घातल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तर मागील काही महिन्यांपासून खाजगी चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यालगत जवळपास अडीचशे ते तीनशे वाहने उभी असतात. काहीजण तर अस्ताव्यस्त वाहने उभी करीत असल्याने अपघाताच्या अनेकदा घटनाही घडल्या आहेत. पूर्वी हीच वाहने शहरातील रामलीला मैदान येथे उभी केली जात असत. परंतु येथील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर मात्र खाजगी वाहनांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने आता ही वाहने थेट शहरातील विविध मार्गावरील मुख्य रस्त्यालगतच उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. खाजगी वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अनेकदा संबंधित प्रशासनाकडे केली होती. मात्र याबाबत कुठलाच ठोस निर्णय झाला नाही. ही वाहने मोकळी जागा दिसेल तिथे उभी केली जात आहेत. परंतु आता शहरातील मुख्य रस्त्यालगतच वाहने उभी केली जात असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टोर्इंगद्वारे वाहने उचण्याचा सपाटा; केवळ दंड वसुलीवर भर
हिंगोली वाहतूक शाखेतर्फे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निर्णयाचे हिंगोलीकरांनी प्रथम स्वागत केले. शहरात धडाकेबाज कारवाई सुरू असल्याने वाहतूक शाखेकडे टोर्इंग व्हॅन उपलब्ध झाले. या वाहनात रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीवर कारवाया केल्या जात असून दंड ठोठावण्यात येत आहे. परंतु शहरात वाहने उभी कोठे करावीत? असा प्रश्न हिंगोलीकरांना पडला आहे. शहरातील मोजक्याच रस्त्यावर पिवळ्या पट्ट्या आखण्यात आल्या आहेत. परंतु ज्या ठिकाणी ही पिवळी पट्टी नाही, तेथूनही वाहने उचचली जात आहेत. त्यामुळे कोणत्या आधारावर कारवाई करून आमची वाहने उचलून नेण्यात आली? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. दुचाकीवर कारवाई केली जात असली तर इतर खाजगी वाहने भर रस्त्यालगतच उभी असतात. त्या वाहनांवर कारवाई का होत नाही, याठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचत नाहीत का? शहरातील वाहतूक कोंडीचा खरंच प्रश्न मिटावायचा असेल तर केवळ दुचाकींवरच कारवाई का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
तर कठोर कारवाई-पोलीस अधीक्षक
वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. जेणेकरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होईल. अशा वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. शहरात वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इतरत्र वाहने उभी न करता सदर वाहने पार्किंगच्या ठिकाणी उभी करावीत. ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा होईल. अशा स्थितीत वाहने कोणीही उभी करू नयेत, अशा प्रकारे वाहने उभी असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. ४हिंगोली शहरातील गांधी चौक, वाहतूक शाखेच्या कार्यालगतच रस्त्याच्या बाजूला, जि. प. कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहने, इंदिरा गांधी चौक ते महेश चौकात रस्त्याच्याकडेला, टपाल कार्यालय परिसरातही बिनदिक्कतपणे ट्रक उभे केले जात आहेत. तर शहरातील जवाहर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर, रेल्वेस्थानक रस्ता आदी ठिकाणी वाहने बिनधास्त उभी असतात.