हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:04 PM2023-04-08T13:04:40+5:302023-04-08T13:05:15+5:30
प्रयोगशाळेच्या कामाला मिळणार गती, पूर्वी केवळ भूसंपादनाचे झाले होते काम; हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी - दुधाळा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी होणाऱ्या प्रयोगशाळेला केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण आले आहे. सन २०१६ पासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला निधी नसल्यामुळे केवळ जमीन भूसंपादनाची प्रक्रियाच पूर्ण झाली होती. आता केंद्राने मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
प्रकल्पाला सन २०१६ मध्ये केंद्र शासनाने प्राथमिक मंजुरी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेझर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल-वेव्ह ऑब्जर्वेटरी प्रकल्पासाठी २२५ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली होती. ही जमीन सन २०२१ मध्ये प्रकल्पाला हस्तांतरितही करण्यात आली होती. मात्र, या प्रयोगशाळेच्या मुख्य कामाला सुरुवात होण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणे गरजेचे होते. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी तब्बल दाेन हजार ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेच्या कामाला गती मिळणार आहे.
वसाहतीच्या कामालाही प्रारंभ...
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मक्ता भागात या ठिकाणी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभी केली जात आहे. या वसाहतीच्या कामालाही प्रारंभी झाला आहे. वसाहत व रस्त्यांसाठी जमीन भूसंपादन प्रक्रियाही पार पडली आहे.
जगातील तिसरी वेधशाळा...
गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अमेरिकेत अस्तित्वात आहेत. नासाकडून त्यांचे परिचालन होते. आता जगातील तिसरी प्रयोगशाळा अंजनवाडा- दुधाळा परिसरात उभारली जाणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ व नासाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी अनेकदा भेटी देऊन गेले आहेत.
प्रयोगशाळा मंजुरी फायद्याची : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
औंढा तालुक्यातील अंजनवाडी- दुधाळा परिसरात होणाऱ्या लायगो इंडियाच्या प्रयोगशाळेचा विकासाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर संशोधनाच्या दृष्टीतून जगाला फायदा होणार आहे. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगारांच्या मोठ्या संधीही उपलब्ध होतील. या प्रकल्पाची जागा हस्तांतरित झाली असून, वसाहतीचे कामही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
शास्त्रज्ञांच्याही भेटीगाठी वाढतील : प्रो. संजित मित्रा
केंद्राने लिगोच्या प्रत्यक्ष कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हळूहळू बांधकामेही सुरू होतील. अमेरिका व या वेधशाळा संदर्भातील शास्त्रज्ञांच्या भेटीगाठी वाढणार असल्याची माहिती आयुकाचे शास्त्रज्ञ प्रोफेसर संजित मित्रा यांनी दिली आहे.