हिंगोलीचा पारा ४१ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:15 AM2018-04-04T00:15:21+5:302018-04-04T00:15:21+5:30
मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उन्हाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. पुढील चार दिवस हिंगोलीकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उन्हाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. पुढील चार दिवस हिंगोलीकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणात बदल होऊन चिमुकल्यांना विविध आजारही जडत आहेत. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी शहरात फळे व उस रसवंतीची गाडे, तसेच थंडपेयांची विविध दुकाने थाटली आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्ष
उष्माघात झाल्यास रूग्णाला तात्काळ उपचार मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, व वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात माहिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. स्थापन करण्यात आलेल्या उष्माघात कक्षातील माहिती दररोज दोन तासांनी आरोग्य अधिकाºयांना पाठविण्यात येईल. त्यानंत ही सर्व एकत्रीत माहिती राज्यस्तरावर पाठविली जाणार आहे. संबधित आरोग्य यंत्रणेस उष्माघात कक्षात नेहमी सजग राहण्याच्या सूचनाही आहेत.
उष्माघातापासून सावधान..
४सर्वांनीच उष्माघातपासून बचावासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हात घराबाहेर पडू नये, शिळे अन्न खाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. मद्य, चहा, कॉफी, प्राशन करू नये. सौम्य रंगाचे सैल कपडे वापरावेत. घराबाहेर पडताना रूमाल, टोपी किंवा छत्री सोबत घेऊन जावी. लहान मुलांना शक्यतोवर उन्हात घराबाहेर पडू न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जिल्हा आरोग्य विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र उष्माघात कक्षात आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. कक्षात, थंड वातावरण, कुलर व फॅन व्यवस्था केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा...
४ उष्माघातापासून बचावासाठी डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उन्हातून आल्यानंतर दम लागल्यास किंवा ताप आल्यास हे उष्माघाताचे लक्षण आहे. त्यामुळे रूग्णास तात्काळ उपचारासाठी घेऊन जावे, असे जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले. उन्हामुळे डोळे लाल होऊन डोळ्यांचे आजार उदभवू शकतात. त्यामुळे शक्यतोवर घराबाहेर पडताना चष्म्याचा वापर करावा असे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार म्हणाले.