हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:21 PM2023-08-24T16:21:50+5:302023-08-24T16:23:17+5:30
दहावीपर्यंत झेडपी शाळेत घेतले शिक्षण, दोनवर्षांपासून इस्त्रोमध्ये आहे शास्त्रज्ञ
- इस्माईल जाहगीरदार
वसमत (जि. हिंगोली): चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी यशस्वी कामगिरी केली असून या टीममध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा येथील महेश दिलीप काळपांडे शास्त्रज्ञाचा सहभाग आहे. या यशामुळे वसमत तालुक्यात जल्लोष साजरा केला जात असून कुरुंदा गावात आई- वडिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
महेश काळपांडे यांचे प्राथमिक शिक्षण कुरूंदा येथे झाले आहे.शास्त्रज्ञ होऊन मोठेपणी भारताचे नावलौकीक करायचे असे महेश लहानपणापासून म्हणायचे. त्यांचे स्वप्न पथकात सहभाग घेऊन पूर्ण झाले आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान- ३ चंद्रावर उतरले. तेंव्हा वसमत तालुक्यासह कुरूंदा येथे जल्लोष करण्यात आला. दिवाळी सारखी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाली. त्यानंतर ती मोहीम अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले. या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.
महेश काळपांडे कोण आहेत...
महेश यांचे वडील दिलीप काळपांडे डॉक्टर आहेत. तर वसमत तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आई मालाबाई दिलीप काळपांडे या शिक्षिका आहेत. कुरुंदा येथील जि.प. शाळेत १० वी पर्यंत महेशचे शिक्षण झाले. त्यांनंतर त्यांनी लातूर येथील राजश्री शाहू विद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे पुणे येथे ‘एमटेक’ व इस्रोसाठी स्पर्धा परीक्षा दिली ,दोन वर्षांपूर्वी त्याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली, त्यास सुरुवातीस अंटार्टिका येथे एक वर्ष प्रशिक्षण दिले त्यानंतर बंगळुर येथे नियुक्ती मिळाली.
हिंगोली जिल्ह्यातील लोकांना गर्व आहे...
चांद्रयान -३ भारताने यशस्वी केली आहे. या चांद्रयान- ३ या टीममध्ये आमचा मुलगा आहे. मुलगा म्हणून आम्हाला आनंद आहेच. पण हिंगोलीकरांना महेशचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया महेशचे वडिल डॉ. दिलीप काळपांडे व आई माला काळपांडे यांनी दिली.