नो स्टॉक! ट्रक-टँकर चालकांच्या संपाचा फटका, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा
By विजय मुंडे | Published: January 2, 2024 11:31 AM2024-01-02T11:31:32+5:302024-01-02T11:34:00+5:30
नवीन मोटार कायद्यानुसार कोणताही अपघात झाल्यास वाहन चालक व मालक त्यास जबाबदार राहणार आहेत.
हिंगोली : शासनाच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्यातील जाचक अटीचा फेरविचार करून त्या मागे घ्याव्यात, यासाठी चालकांच्या वतीने २ जानेवारी रोजी आंदोलन करणार आहेत. याचा परिणाम १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपासून पेट्रोलपंपांवर दिसून आला. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी चालकांची झुंबड उडाली होती.
नवीन मोटार कायद्यानुसार कोणताही अपघात झाल्यास वाहन चालक व मालक त्यास जबाबदार राहणार आहेत. परंतु, प्रत्येक अपघातास वाहनचालकाचीच चूक असते, असे नाही. अनेक वेळा इतर कारणेही अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे प्रस्तावित कायद्यातील तरतुदीचा फेरविचार करून जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी चालकांनी केली आहे. त्यासाठी वाहने चालविण्यास चालक नकार देत असल्याने पेट्रोल, डिझेलचे टॅंकर पंपांपर्यंत पोहोचणे अवघड होत आहे. पेट्राेल व डिझेल वाहतुकीच्या चालाकांनीही वाहन चालविण्यास नकार दिला.
परिणामी, २ जानेवारी रोजी पंपांवर पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे आदल्या दिवशी सोमवारी नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरून घेतले. सायंकाळी ७ च्या सुमारास शहरातील पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम होत्या. या दिवशी एक लिटर पेट्रोलसाठी १०७ रूपये ३७ पैसे तर डिझेलकरिता ९३ रूपये ८७ रूपये मोजावे लागले.
काही पंप सोमवारीच पडले बंद
चालकांनी आधीच डिझेल व पेट्राेलची वाहतूक करण्यास नकार दिल्याने शहरातील तीन ते चार पेट्राेल पंप आधीच बंद पडल्याचे दिसून आले. काही पंपावर सायंकाळी पेट्राेल व डिझेल येताच रांगा लागल्या होत्या. उद्या चित्र आणखी बिकट होण्याची शक्यता दिसत आहे.