हिवरखेडा, केलसुला दोन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:20+5:302021-01-25T04:31:20+5:30
सेनगाव : तालुक्यातील हिवरखेडा व केलसुला येथील वीजबिल थकीत असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून गावातील रोहित्राचा वीजपुरवठाच थेट ...
सेनगाव : तालुक्यातील हिवरखेडा व केलसुला येथील वीजबिल थकीत असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून गावातील रोहित्राचा वीजपुरवठाच थेट बंद केला. त्यामुळे दोन दिवसांपासून दोन्ही गावे अंधारात सापडली आहेत.
वीजबिल वसुली होत नसल्याने थेट गावाचाच वीजपुरवठा खंडित करण्याचा अजब प्रकार सेनगाव वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अनेक ग्राहक नियमितपणे वीजबिल भरत असताना थकीत ग्राहकांबरोबर थेट बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याने दोन दिवसांपासून केलसुला, हिवरखेडा ही गावे अंधारात आहेत. या प्रकारामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वीजबिल थकीत असणाऱ्या ग्राहकांची वीजजोडणी तोडून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची गरज असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण गावाचाच वीजपुरवठा खंडित केला आहे. याचा नियमित बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता, जोपर्यंत गावातील ग्राहक बिलाचा भरणा करणार नाहीत, तोपर्यंत वीजजोडणी करणार नाही, असे उत्तर देण्यात आले. गावात वीजपुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाइल, टीव्ही, पिठाच्या गिरण्या, पाण्याची अडचण निर्माण होत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
फोटो नं. २४