हिंगोली पंचायत समितीसमोर सरपंच संघटेनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:33+5:302021-09-22T04:33:33+5:30
हिंगोली पंचायत समितीत गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे हे राहत नसल्याचा आरोप करून यापूर्वीही सरपंचांनी आंदोलन केले होते. मंगळवारी ...
हिंगोली पंचायत समितीत गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे हे राहत नसल्याचा आरोप करून यापूर्वीही सरपंचांनी आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा सरपंच संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात पंचायत समिती स्तरावरून विविध योजनांची माहिती संबंधित ग्रामसेवकांना पत्राद्वारे कळवावी, मग्रारोहयोअंतर्गत प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत, १५व्या वित्त आयोगाच्या केलेल्या कामांच्या निधी वितरणासाठी दिलेले कंत्राट तत्काळ रद्द करून त्या जागी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी, सरपंच व ग्रामसेवकांची पंचायत समिती स्तरावर मासिक सभा घेण्यात यावी, ग्रामसेवकांनी सरपंचांचे फोन तत्काळ रिसिव्ह करण्यास आदेशित करावेत, ग्रामसेवकांनी आठवड्यातून दोन दिवस मुख्यालयी हजर राहण्यास आदेशित करावे, विस्तार अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, संगणक ऑपरेटरला प्रशिक्षण द्यावे, १५व्या वित्त आयोगाचे बँकेत असलेले खाते कायम ठेवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी सरपंच संघटनेच्या वतीने दोन तास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे हे पंचायत समितीत दाखल झाले. त्यांनी सरपंचांच्या विविध मागण्या ऐकून घेत त्यांना यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.