५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड्स बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:28+5:302021-06-09T04:37:28+5:30
हिंगोली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्ताचे कर्तव्य बजावणाऱ्या ५० वर्षावरील होमगार्डला आता कोरोनामुळे काम मिळणे अवघड बनले असून ...
हिंगोली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्ताचे कर्तव्य बजावणाऱ्या ५० वर्षावरील होमगार्डला आता कोरोनामुळे काम मिळणे अवघड बनले असून रोजंदारी करण्याची वेळ आली आहे. संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
कोरोनामुळे व्यावसायिकांसह रोजंदारी करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हाताला काम मिळत नसल्याने कुटूंबियांचा भार कसा पेलायचा हिच चिंता सतावत आहे. हिच गत होमगार्डचीही झाली आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सण, उत्सव, निवडणूक बंदोबस्तासह इतरही जबाबदारी होमगार्ड समर्थपणे पेलत आहेत. त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होण्यास मदत होत आहे. तसेच अनेेक गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना मदतही होते. मात्र कोरोना संसर्गामुळे ५० वर्षावरील होमगार्डला बंदोबस्त देवू नयेत, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळाल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून होमगार्डना बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा करायचा ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. काही होमगार्ड आता उपजिविकेसाठी रोजमजुरीवर जात असल्याचे चित्र आहे.
लसीकरणास प्रतिसाद
जिल्ह्यातील होमगार्ड यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा समादेशक कार्यालयाने दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्ड लसीकरण करून घेत आहेत. अनेक जणांनी पहिला डोस घेतला असून लवकरच सर्व होमगार्डचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती कार्यालयातून देण्यात आली.
आम्ही जगायचे कसे ?
कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून होमगार्डना बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. आता कुटूंबियाच्या उदरनिर्वाहासाठी रोजमजुरी करण्याची वेळ आली आहे.
- बळीराम बाभूळकर, होमगार्ड
पूर्वी बंदोबस्त मिळत असल्याने कुटुंबियाचा उदरनिर्वाह होत होता. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी मदत होत होती. कोरोनामुळे बंदोबस्त मिळत नसल्याने घर चालवायचे कसे ? याचीच चिंता लागत आहे.
-कविचंद सुरूशे, होमगार्ड
कमी मानधनावर आम्ही सण, उत्सव, निवडणूक बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावले. आता कामाची खरी गरज होती. मात्र ऐन गरजेच्या वेळी ५० वर्षावरील होमगार्डना काम मिळत नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे.
- विलास माखणे, होमगार्ड
दिवसाला मिळते ६७० रूपयांचे मानधन
सण, उत्सव, निवडणूक बंदोबस्त, प्रमुख नेत्यांचा दौरा या निमित्त होमगार्ड यांना बंदोबस्तासाठी बोलावले जाते. आता कोरोना काळातही काही जणांना बंदोबस्ताला बोलावण्यात आले आहे. रोटेशन पद्धतीने कर्तव्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बंदोबस्त मिळाला तर दिवसाला ६७० रूपयांचे मानधन दिले जाते. यात कर्तव्य भत्ता म्हणून ५७० रूपये तर उपहार भत्ता म्हणून १०० रूपये मानधन दिले जाते.
जिल्ह्यातील नाेंदणीकृत होमगार्डस -६५०
महिला होमगार्ड्स संख्या - ११६
५० पेक्षा जास्त वय असलेले - ११५
सध्या बंदोबस्तावर असलेले - १९९