विद्यार्थ्यांच्या स्वागताला मान्यवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:11 AM2018-06-15T00:11:49+5:302018-06-15T00:11:49+5:30
शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार, आमदार, जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्य तसेच सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी शाळेत येणार आहेत. शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार असून महसूल, जि.प., पोलीस, कृषी आदी विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार, आमदार, जि.प., पं.स., ग्रा.पं. सदस्य तसेच सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी शाळेत येणार आहेत. शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार असून महसूल, जि.प., पोलीस, कृषी आदी विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ एच.पी.तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पुढाकार घेत या उपक्रमाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व लोकप्रतिनिधींनाही आपापल्या भागातील किमान एका शाळेवर उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८८४ शाळा असून प्रत्येक शाळेत एक लोकप्रतिनिधी, अधिकारी किंवा कर्मचारी स्वागताला उपस्थित राहावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच या मंडळींचे मोलाचे मार्गदर्शनही या चिमुकल्यांना पहिल्या दिवशीच मिळणार आहे. चिमुकल्यांच्या स्वागताला ही मान्यवर मंडळी आल्यामुळे त्यांचा उत्साह वाढावा, त्यांची शाळेबद्दलची भीती दूर व्हावी, यासाठी हा उपक्रम आहे.
आजही अनेक मुले शाळेत जाण्यास घाबरतात. अशांना या उपक्रमामुळे पहिल्या दिवशी आनंदी व आल्हाददायक वातावरण मिळाल्यास त्यांच्या मनातील ही भीती दूर होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ, पुस्तके आदींचेही वाटप केले जाणार आहे.