गुप्तधनाच्या लालसेने अघोरी कृत्य, घरातच खोदला १२ फुट खोल खड्डा; सात जणांवर गुन्हा
By विजय पाटील | Published: February 27, 2024 12:30 PM2024-02-27T12:30:45+5:302024-02-27T12:34:34+5:30
घरात गुप्तधन शोधताना आढळले. त्यांनी दहा ते बारा फूट खोल खड्डाही खोदला होता.
हिंगोली : गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घरात जादूटोणाच्या वापर करीत १० ते १२ फूट खोल खड्डा खोदल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथे उघडकीस आला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथे शिवप्रसाद आत्माराम सूर्यवंशी यांच्या घरात खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले. आदल्या दिवशी रात्रीपासूनच या घरात संशयास्पद हालचाली सुरू होत्या. भानामती, कारणी या नावाने अनिष्ठ व अघोरी कृत्य किंवा जादूटोणा यासारखा प्रकार सुरू असल्याचे गावातील काही लोकांना कळाले. यावरून त्यांनी पोलिसांना कळविले होते.
त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता शिवप्रसाद सूर्यवंशी यांच्या घरात कळमनुरी तालुक्यातील जांभरुण येथील काशीनाथ सीताराम जुमडे, हिंगोलीतील मस्तानशहानगरातील दौलतखान शब्बीरखान पठाण, बावणखोलीतील चंद्रभान जळबाराव इंगोले, औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील मन्सूरखान नबीखान पठाण, गुलशराबी मन्सूरखॉं पठाण, वर्षा शिवप्रसाद सूर्यवंशी हे जादूटोण्याचा वापर करीत घरात गुप्तधन शोधताना आढळले. त्यांनी दहा ते बारा फूट खोल खड्डाही खोदला होता. पोलिसांनी या सर्व सातही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस नायक दिलीप नागोराव पोले यांच्या तक्रारीवरून या सात जणांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.