रक्त तुटवड्यामुळे रूग्णांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:55 AM2018-05-12T00:55:29+5:302018-05-12T00:55:29+5:30
जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच शाळा-महाविद्यालयांना सुट्या असून लग्नसराईमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी, जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्त पिशव्यांची कमतरता भासत आहे. शिवाय शासकीय रक्तपेढीतून खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठीही टोल क्रमांक १०४ द्वारे रक्तपिशव्यांचा पुरठा केला जातो. २०१७ मध्ये टोल फ्री क्रमांक १०४ वरून आलेल्या रूग्णांना विविध गटाच्या ८१६ रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जानेवारी २०१८ मध्ये ४४ बॅग, फेबु्रवारीत ९२, मार्चमध्ये ६७ आणि एप्रिलमध्ये ६५ रक्त रक्त बॅगचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रक्त पिशव्यांची मागणी जास्त अन् रक्तसाठा मोजका यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. ऐनवेळी गरजू रूग्णास जर रक्त दिले नाही, तर रूग्णांची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रूग्ण दगावण्याचीही शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रूग्णायातील रक्तपेढीत सध्या ए पॉझिटीव्हच्या २ बॅग उपलब्ध आहेत. तसेच ए-निगेटीव्हच्या २, बी-पॉझिटीव्ह १६ बॅग, बी-निगेटीव्हच्या ४, एबी-पॉझिटीव्ह २, एबी-निगेटीव्ह केवळ १ ओ-पॉझिटीव्ह ११, ओ -निगेटीव्हच्या ६ अशा एकूण ४४ बॅगा जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत
उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाततर्फे देण्यात आली. जास्तीत जास्त सामाजिक संघटना तसेच युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. स्वाती गुंडेवार यांनी केले आहे. रक्तपेढीतील १४ जणांची टीम यासाठी कार्यरत आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांनाही रक्त पुरवठा होतो. शासकीय रक्तपेढीपासून ४० किमी अंतरावरावरील खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो.