पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 23, 2024 06:56 PM2024-01-23T18:56:09+5:302024-01-23T18:56:21+5:30
घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता.
हिंगोली : वसमत तालुक्यातील पळशी येथे घरफोडी करून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यात एकास ताब्यात घेतले असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रोख ६० हजार रूपये, एक कार, दोन लोखंडी रॉड जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळशी येथे १८ जानेवारी रोजी रात्री सोपान बेंडे यांच्या घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे गतीमान केली. यावेळी या घटनेतील एक चोरटा गावातीलच असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पळशी येथील सचिन मोहन शिंदे यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच यात वसमत तालुक्यातील दोघे साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचेकडून त्याचे हिश्याला आलेले नगदी ६० हजार रूपये, एक कार व दोन लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त केला.
अन्य दोन चोरट्यांचा शोध सुरू
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन मोहन शिंदे यास हट्टा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्या दोन साथीदाराचा शोध सुरू केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.