माझ्यापेक्षा माझ्या मित्राला जास्त गुण कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:35+5:302021-08-24T04:33:35+5:30
हिंगोली : दहावी, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या मागील गुणांवर व अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. दोन्ही इयत्तांचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा ...
हिंगोली : दहावी, बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या मागील गुणांवर व अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर करण्यात आला. दोन्ही इयत्तांचा निकाल ९९ टक्क्यांपेक्षा जास्त लागला. या निकालाने ढ विद्यार्थ्यांची लाॅटरी लागली असली तरी अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काहींनी क्रीडा गुण मिळाले नसल्याचे तर काहींनी मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण दिल्याने आम्हाला गुण कमी मिळाल्याचा आरोप केला आहे.
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले....
आमच्या पाल्याने वर्षभर अभ्यास केला होता. जास्त गुण मिळतील अशी अपेक्षा होती. खेळाडू असूनही क्रीडा गुण मिळाले नाहीत. शाळा प्रशासनाने गुणदान करताना भेदभाव केला.
- रश्मी राहुलकुमार वाढवे
बारावीचे वर्ष असल्याने मुलाने भरपूर अभ्यास केला होता. आम्ही अभ्यासासाठी सतत पाठपुरावा करत होतो; परंतु मुलाची मेहनत कामी आली नाही. उलट मेहनत करूनही गुण कमी पडले.
- बाबूराव खराटे, काैठा
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?
- शाळांनी गुणदान करताना मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण दिल्याचा आरोप पालक व विद्यार्थ्यांतून होत आहे.
- वर्गातील इतर मित्र अभ्यासात हुशार नसताना त्यांना जास्त गुण मिळाले आहेत.
- मी त्याच्यापेक्षा हुशार असताना त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे, असा सवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थी म्हणतात...
दहावीचे वर्ष असल्याने खूप अभ्यास केला होता. क्रीडा प्रकारातही कामगिरी केली. मात्र, मला कमी गुण मिळाले. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा ढ असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले. शाळेने गुणदान करताना भेदभाव केला.
ऋत्विक वाढवे, विद्यार्थी
बारावीचे वर्ष असल्याने भरपूर अभ्यास केला होता. अभ्यासाव्यतिरिक्त कोणतेच काम केले नाही; परंतु परीक्षाच झाल्या नाहीत. परीक्षा झाल्या असत्या तर जास्त गुण मिळाले असते. जास्त अभ्यास करूनही अपेक्षित गुण मिळाले नाहीत.
- अनिल खराटे, काैठा