दोन्ही शाळांत अचानक विद्यार्थी वाढले कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:12 AM2018-03-02T00:12:55+5:302018-03-02T00:12:59+5:30
दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीनंतर निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीनंतर निर्माण झाला आहे.
तालुक्यातील कापडसिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व गजानन माध्यमिक विद्यालय येथे कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. मात्र येथे दहावीत तब्बल सातशे विद्यार्थी प्रवेशित असल्याचा प्रकार परीक्षेच्या दोन दिवस आधी लक्षात आला. यामुळे जि.प.चा शिक्षण विभागही अवाक झाला. पंरतु एवढे विद्यार्थी परीक्षेला बसवायचे कुठे? या गोंधळात शिक्षण विभागाने सेनगावातील शिवाजी माध्यमिक विद्यालय व लक्ष्मीबाई येवले विद्यालयात ऐनवेळी परीक्षा केंद्र दिले. गुरुवारी पहिल्या दिवशी या गोंधळातच परीक्षा पार पडली. कापडसिनगी येथील दोन्ही विद्यालयात प्रवेशित असणारे विध्यार्थी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून सेनगाव येथे आले होते. तब्बल सातशे विद्यार्थी परभणी, नांदेड, बीड, लातूर, जालना इ. जिल्ह्यातील असल्याचे परीक्षा केंद्रात प्रवेश दिल्यानंतर समोर आले. विशेष म्हणजे सर्वच परीक्षार्थी हे वयस्कर होते. त्यामुळे दहावी प्रवेशाचा गोंधळ हा पांसिग करणाºया रॅकेटचाच एक भाग असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराविरोधात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांनी आज येवले विद्यालयात शिक्षणाधिकारी चवणे यांची भेट घेऊन धारेवर धरले. तर बोगस प्रवेशांची चौकशी करावी, कापडसिनगी येथील शाळेत कोणत्याही भौतिक सुविधा नसताना मराठवाड्यातील विविध भागात राहणारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी कसे आले, याचा जाब विचारला. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
प्रकरणाचे गांभीर्य वाढत असल्याने शिक्षणाधिकारी चवणे, गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप यांनी चौकशी करण्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी, पत्रकार यांना घेऊन कापडसिनगी गाठली. अंदाजाप्रमाणे यावेळी दोन्ही शाळांची बोगसगिरी चव्हाटावर आली.
गजानन माध्यमिक विद्यालय शेडमध्ये चालू आहे. शाळा आज सकाळपासून कुलूपबंद होती. येथे दहावीचे ३९८ विद्यार्थी प्रवेशित कसे? याचे उत्तर द्यायला कुणी नसेल तरी शाळेच्या अवस्थेवरून सर्व गौडबंगाल समोर आले. रेखेबाबा विद्यालयाचा कारभार तर नावाच्या फलकावर चालू असल्याचे
शिक्षणाधिकाºयांच्या भेटीत समोर आले. येथेही दहावीचे ३०० आहेत. शिक्षण विभागाचे वाभाडे काढणारा व शाळेची दुकानदारी समोर आणणारा प्रकार दिसून आला. शिक्षणाधिकारी चवणे यांनी या दोन्ही शाळेचा पंचनामा केला.
सर्व विद्यार्थांचे प्रवेश निर्गम, टी.सी.तपासणी करण्याची गरज आहे. परीक्षा बोर्डानेही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे योग्य चौकशी झाल्यास रॅकेट उघड झाल्यास नवल नाही.
परीक्षेचा पहिल्या दिवशी या वाढीव विद्यार्थ्यांकरिता निर्माण केलेल्या शिवाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर २९८ पैकी २२२ जणांनी परीक्षा दिली. तब्बल ७२ जण गैरहजर होते. तर येवले विद्यालयात ३९६ पैकी २८३ जणांनी परीक्षा दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर होते. दोन्ही केंद्रांवर १८९ जण गैरहजर होते. केंद्रावर परीक्षार्थींसोबत आलेल्या अन्य नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक संशयास्पद, ओळख न पटलेल्या विद्यार्थ्यांनी हॉलतिकीटवर फोटो नसताना परीक्षा देण्याचा प्रकार घडला. एकंदर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे.