किती ही लूट; मंडईत भेंडी १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:46+5:302021-07-30T04:31:46+5:30
हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो ...
हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो दर लावून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे मंडईत दर वेगळा व घराजवळ आल्यानंतर भाजीचा दर वेगळा राहत असल्याचे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील औंढा नागनाथ, डिग्रस, कळमनुरी, आंबाचोंडी, जवळा बाजार, हट्टा, सवड, कनेरगाव, सेनगाव आदी गावांतील शेतकरी दोन पैसे मिळावेत म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. परंतु, हल्ली त्यांच्या भाजीपाल्यांना मंडईत म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी भाजीपाल्याचे दुकान टाकून मंडईत बसत आहेत. काही व्यापारी कमी दराने भाजीपाला विकत घेत आहेत आणि नंतर चढ्याने त्याची विक्री करीत आहेत, असेही निदर्शनास आले. महागाईत काहीच परवडत नाही, असे छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोना महामारीमुळे तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापारासाठी दिलेली वेळ कमी पडत आहे. त्यामुळे भाजीपाला घेतला तसाच घरी घेऊन जावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची नासाडी होत आहे, असेही मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
मंडईत वेगळा दर अन् घराजवळ वेगळा...
सद्य:स्थितीत भाजीपाला मुबलक येत आहे. परंतु, भाज्यांच्या दरामध्ये मात्र बरीच तफावत आढळून येत आहे. कारले आरोग्याला चांगले असते म्हणून ग्राहक खरेदी करतात. मंडईत कारल्याचा दर ३० रुपये किलो असून घराजवळ विकत घेतल्यास त्याचा भाव ४० रुपये होतो. घासघीस केल्यानंतर ते ३५ रुपये किलोने देण्यास तयार होतात. दरामध्ये एवढी तफावत का आहे, असे विचाल्यास छोटे व्यापारी निरुत्तर होतात.
प्रतिक्रिया
अर्धापाव, किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !
कोरोना महामारीमुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्धापाव, किलोसाठी मंडईत जाणेही परवडत नाही. नाईलाजास्तव घराजवळ आलेल्या गाड्यावरुनच भाजी खरेदी करावी लागत आहे अन् तीही वाढत्या दरानेच.
- शांताबाई थोरात, गृहिणी
दोन महिन्यांपूर्वी भाजीपाला स्वस्त मिळायचा. परंतु, आठ-दहा दिवसांपासून भाजीपाला महागच मिळत आहे. भाजीविनाच स्वयंपाक करण्याची वेळ सर्वच गृहिणींवर येवून ठेपली आहे. भाज्यांचा दर मंडईत वेगळा व घराजवळ वेगळाच आहे.
- सीमा नागरे, गृहिणी
हा बघा दरांमधील फरक (प्रति किलो दर)
भेंडी १०
२०
कारले ३०
४०
गवार ३५
४०
दोडके २५
३०
वांगे ५०
५५
आलू १५
२०
फूलकोबी २०
२५
पानकोबी १५
२०
मिरची २०
२५
चवळी २०
२५
ढोबळ मिरची २०
२५