‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार ; दोन्ही डोस घेणारे ३० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:31+5:302021-07-03T04:19:31+5:30
हिंगोली : गत काही दिवसांपासून ‘डेल्टा प्लस’ने सर्वत्र चिंता वाढविली असताना जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजमितीस ‘डेल्टा ...
हिंगोली : गत काही दिवसांपासून ‘डेल्टा प्लस’ने सर्वत्र चिंता वाढविली असताना जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजमितीस ‘डेल्टा प्लस’ समोर ठेवून ३० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण लसीकरण २ लाख १२ हजार २७८ नागरिकांनी केले आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात निघत असले तरी ‘डेल्टा प्लस’ या आजाराची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. हिंगोली शहरात आजपर्यंत १३ हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. तर ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा येेथे ८ हजार ४१९ नागरिकांनी लसीकरण करून घेेतले आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. प्रारंभी लसीकरणासाठी ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला होता. आता युवकही लसीकरणासाठी पुढे येत आहेत. आजमितीस जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीचे डोस संपले असून कोवॅक्सिन लसीचे डोस ४ हजार ५०० शिल्लक आहेत. कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसीबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच जिल्ह्यासाठी दोन्ही लसींचे डोस जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. लसीकरणाचा पहिला डोस १ लाख ७१ हजार १८६ तर लसीकरणाचा दुसरा डोस ४१ हजार ९२ एवढा झाला आहे.
१८ ते ४४ वयोगटात २० टक्के लसीकरण
मध्यंतरी युवकाचे लसींचे डोस संपल्यामुळे युवकांचे लसीकरण थांबले होते. परंतु, त्यानंतर जिल्ह्याला दोन्ही लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे युवकाचा ओढा लसीकरणाकडे परत वाढला होता. सद्य:स्थितीत युवकही लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहेत. १८ ते ४४ वयोगटामध्ये २० टक्के जवळपास लसीकरण झाले आहे. तिसऱ्या लाटेपासून बचाव करायचा असेल तर लसीकरण करून घेणे, मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या बाबीचे तंतोतंत पालन केले तर तिसरी लाट रोखता येईल. त्याचबरोबर वेळेवर लसीकरण करुन घेतल्यास ‘डेल्टा प्लस’ या आजारालाही पळवून लावता येईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील एकूण लसीकरण २ लाख १२ हजार २७८
पहिला डोस १ लाख ७१ हजार १८६
दुसरा डोस ४१ हजार ९२
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा या पाचही तालुक्यांत लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात सर्वाधिक लसीकरण हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले आहे. कोरोना महामारी संपुष्टात येत असली तरी ‘डेल्टा प्लस’ची भीती नागरिकांमध्ये आहे. खरे पाहिले तर ‘डेल्टा प्लस’चा जिल्ह्यात आजपर्यंत तरी एकही रुग्ण आढळून आला नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता लसीकरण वेळेवर करून घ्यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी केले आहे.
शहरी भागात हिंगोली तर ग्रामीण भागात हट्टा
लसीकरणाने वेग मोठ्या प्रमाणात वेग घेतला आहे. सद्य:स्थितीत हिंगोली शहरात १३ हजार जणांनी लसीकरण केले तर ग्रामीण भागात हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ हजार ४१९ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.