अपुऱ्या बालरोगतज्ज्ञांवर तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:45+5:302021-05-28T04:22:45+5:30
हिंगोली जिल्ह्यासह राज्यभर तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला धोका लक्षात घेता, नियोजन करण्यात प्रशासन दंग आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही ...
हिंगोली जिल्ह्यासह राज्यभर तिसऱ्या लाटेत मुलांना असलेला धोका लक्षात घेता, नियोजन करण्यात प्रशासन दंग आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही तयारी सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत बालकांसाठी किमान दोन खाटा तरी राखीव ठेवण्याचे नियोजन आखले जात आहे. त्यातच गर्भवती महिलांनाही कोरोनाचा जास्त धोका असतो, ही बाब लक्षात घेता, नवजात बालकांसाठी वॉर्मरची व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. यासाठी विभागीय स्तरावर टास्क फोर्सची स्थापना केली असून त्यामार्फत या नियोजनावर लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर लहान मुलांना लागणारे व्हेंटिलेटर, मास्क, औषधी आदींचेही नियोजन तयार करून ठेवले आहे. लवकरच प्रशासनाकडून याची मागणीही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वीच्याच ठिकाणी काही प्रमाणात बदल करून मुलांसाठी खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
सध्या बालरुग्णांसाठी ग्रामीण भागात फारशा सोयी-सुविधा नाहीत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित डॉक्टर मिळत नसल्याने, तेथे बालरोगतज्ज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. एवढेच काय, एका तालुक्याच्या ठिकाणीही बालरोगतज्ज्ञ नसल्याने ही बाब अडचणीची ठरणारी आहे.
१५० खाटांचे नियोजन
१० लाख लोकसंख्येमागे ३० एनआयसीयु खाटा अपेक्षित आहेत. मात्र कोरोनात प्रशासन जिल्ह्यात १५० खाटांचे नियोजन करीत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात ५० खाटा, वसमत व कळमनुरीत प्रत्येकी ३० खाटा, ग्रामीण रुग्णालयात ५ ते १० खाटा व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक खाट असे नियोजन करण्यात आले आहे.
५० खाटा
बालकांमध्ये आढळणाऱ्या एमआयएस आजारासाठीही स्वतंत्र ५० खाटांची व्यवस्था होणार आहे. ताप व अंगावर पुरळ आढळल्यास तत्काळ अशा रुग्णांना दाखवण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी केले.
जिल्ह्यात शहरी भागात बालरोगतज्ज्ञांची संख्या तशी पुरेशी आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यात खासगी बालरोगतज्ज्ञ मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे गरज पडल्यास त्यांची सेवा मिळू शकेल. चिंतेचे कारण नाही.
- डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्हा रुग्णालय १
बालरोगतज्ज्ञ ८
उपजिल्हा रुग्णालये २
बालरोगतज्ज्ञ ३
ग्रामीण रुग्णालये ३
बालरोगतज्ज्ञ ३
एकूण कोरोनाबाधित १५५५९
बरे झालेले रुग्ण १४७७९
उपचार घेणारे रुग्ण ४३०
१० वर्षांखालील रुग्ण ३४६
११ ते १८ वयोगटाचे रुग्ण ८०४