तिसरी लाट कशी रोखणार? लसींचा साठाच वेळेवर होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:47+5:302021-07-21T04:20:47+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिनचा साठा संपत आला असून, दोन दिवस पुरेल एवढीच लस आजघडीला शिल्लक आहे. त्यामुळे ...
हिंगोली : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिनचा साठा संपत आला असून, दोन दिवस पुरेल एवढीच लस आजघडीला शिल्लक आहे. त्यामुळे कोरोना महामारीची तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ६६ हजार ५०७ कोविशिल्ड व कोवॅक्सिनचे डोस आले होते. यापैकी २ लाख ५० हजार ४६६ डोस नागरिकांना दिले आहेत. जिल्ह्यात लसीकरणाची एकूण २९ केंद्रे असून सद्य:स्थितीत ४ हजार डोस दोन्ही लसींचे शिल्लक आहेत. हे चार हजार डोस दोन दिवस पुरतील, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत उत्साह आहे. परंतु लस वेळेवर मिळत नसल्यामुळे काही दिवस जिल्ह्यातील केंद्रे बंद ठेवावी लागतात, असे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागही लस संपल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कोरोनाची तिसरी लाट समोर असल्यामुळे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
लसीकरणाबाबत उदासीनता का?
लसीकरणाबाबत उदासीनता नाही. आरोग्य विभाग सर्वतोपरीने लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, लस वेळेवर मिळत नाही हेच मुख्य कारण उदासीनतेचे आहे. आज जिल्ह्यात लसीकरणासाठी २९ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांत उत्साह आहे. परंतु, लस संपल्यानंतर नागरिकांना लस मिळत नाही, हे मोठे कोडे आहे. आजमितीस दोन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रीसूत्रीचा वापर करावा. याचबरोबर ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणार असल्यामुळे नागरिकांनी स्वत:बरोबर इतरांची काळजी करत लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
हेल्थ केअर वर्कर्स ७,१५८
फ्रंटलाइन वर्कर्स १३,५३५
सर्वांनी केले लसीकरण
जिल्ह्यातील ७,१५८ हेल्थकेअर वर्कर्सने पहिला तर ४,७१० ने दुसरा डोस घेतला आहे. १३ हजार ५३५ फ्रंटलाइन वर्कर्सने पहिला तर ५ हजार ४३९ ने दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण न केलेला असा एकही कर्मचारी सध्यातरी राहिला नाही. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे.