संतोष बांगर यांचा लागणार कस, कळमनुरी मतदारसंघात यंदा चौरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:37 PM2024-11-09T14:37:30+5:302024-11-09T14:42:12+5:30
सर्वच उमेदवारांचा बैठकांवर भर, कार्यकर्तेही चौफेर सक्रिय
- इलियास शेख
कळमनुरी : ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून, मतदारसंघात चौरंगी लढत होईल असेच दिसते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे डॉ. संतोष टार्फे, महायुतीकडून संतोष बांगर, वंचितकडून डॉ. दिलीप मस्के आणि अपक्ष अजित मगर निवडणूक रिंगणात उभे आहेत. कळमनुरी मतदारसंघात सुरुवातीला वाटले होते की, तिरंगी लढत होईल. परंतु अजित मगर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे निवडणूक चौरंगी होईल, हे निश्चित झाले आहे.
गतवेळेस एकगठ्ठा मते काही प्रमुख पक्षांनाच मिळाली होती. परंतु, यावेळेस काही पक्षांचे विभाजन झाल्यामुळे मतांचे विभाजनही होऊन बसले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे. मतदानाला अजून दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार चुरशीने प्रचार करू लागले आहेत. एवढे असताना अजूनही एकाही नेत्याची सभा झाली नाही. जर मोठ्या नेत्यांची सभा झाली तर चित्र काहीअंशी पालटू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात १० अपक्षांचा समावेश आहे. मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी यात अपक्षांना डावलून चालणार नाही. दुसरीकडे, प्रत्येक उमेदवार आपणच निवडून येतो, असे सांगत आहे. दुसरे म्हणजे, समर्थकांनाही आपला उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आहे. निवडणुकीत स्पर्धक तेच असून, या निवडणुकीत झेंडे बदलले गेले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामीण भागात कोणी मोबाइलवर प्रचार करत आहे तर कोणी प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन भेटून ‘मी निवडणुकीत उभा आहे, लक्ष असू द्या’, असे सांगू लागला आहे. निवडणुकीत उमेदवारांची संख्या १९ झाली असल्यामुळे मत विभाजनाचा फटका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या हालचालीवर अधिकाऱ्यांचे लक्ष
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक अधिकारी उमेदवारांच्या प्रत्यक्ष हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. उमेदवार कुठे सभा घेतात, कोणाला भेटतात, किती खर्च करतात, कुठे कुठे जाऊन प्रचार करतात या सर्व बारकाईवर निवडणूक विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उमेदवारही आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू लागले आहेत. आता खर्च केला तर पुढे चालून सर्व खर्चाचा हिशेब द्यावा लागेल, जर खर्च हिशेबशीर दिला नाही तर नियमांनुसार कार्यवाही होईल, या भीतीने सर्वच उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करू लागले आहेत.