ऊस तोडणीसाठी शेकडो मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:28 PM2019-11-18T23:28:16+5:302019-11-18T23:29:01+5:30
तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.
औंढा नागनाथ परिसरातील तांडे, वाड्या, वस्त्यात कारखान्याला जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. औंढा तालुक्यात बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पीक कापणी, कापूस वेचणीकरिता मजुरांची शोधाशोध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत परिसरातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे अनेक गावातील घरे कुलूपबंद असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सदर कामगार गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा ठिकाणी आपल्या कुटुंबासह जातात, चार-पाच महिने परत येत नसल्यामुळे मुलाबाळांनाही सोबत नेत असल्यामुळे शिक्षणाशिवाय आरोग्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. ऊसतोड कामगारांना नेण्यासाठी कारखान्यदार ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने त्या-त्या गावात उपलब्ध करून देत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तालुक्यामध्ये मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पाच ते सहा महिने कारखान्यावर आता कामगारांना आपल्या परिवारासह रात्रंदिवस राहावे लागणार आहे.