पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:40 AM2019-02-18T00:40:29+5:302019-02-18T00:40:50+5:30
पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते.
जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद योजनेतून कामे करण्यासाठी आधी ग्रामपंचायतींनी प्रस्तावच दाखल न केल्याने बोंब होती. मात्र नंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध बैठकांतून या विषयावर आवाज उठविला. तसेच ग्रामपंचायतींनीही जागे होत प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर यात पुढील प्रक्रिया करण्यासाठी मात्र टोलवाटोलवीच सुरू आहे.
जि.प.च्या बांधकाम उपविभागाने अंदाजपत्रके बनविली नाही, म्हणून काहीकाळ प्रस्ताव ठप्प होते. तर पुढे या योजनेत समन्वयाचा अभाव असल्याने कामेच झालीच नाहीत. आता सर्व पाचही तालुक्याला अनुदानापोटी ३0 लाख रुपये शिल्लकच आहेत.
पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी एरवी ६0:४0 चे प्रमाण पूर्ण करावे लागत होते. तर जलसंधारणाची कामे होत नसल्याने यात अडचणी येत होत्या. पालकमंत्री पाणंद योजनेमुळे ही अडचण दूर झाली होती. शिवाय पुढे या रस्त्याची इतरही कामे विविध योजनांतून करण्यास मुभा असल्याने याकडे कल वाढताना दिसत होता. मात्र या योजनेला प्रशासकीय उदासीनतेमुळे लागलेली घरघर अजूनही कायम आहे.
पहिल्याच कामांना मंजुरी दिली जात नसल्याने नवीन कामे कोणी प्रस्तावित करीत नसल्याचे दिसत आहे.
चालू आर्थिक वर्षात २0 हजार ६४६ मस्टर काढण्यात आले. यापैकी १८ हजार १0६ मस्टर वेळेत काढले. मात्र २५४0 मस्टर विलंबाने निघाले. यात ४.१९ कोटी रुपयांची मजुरी मजुरांना विलंबाने मिळाली. औंढा ना. ७६.४९ लाख, वसमत-१६.४३ लाख, हिंगोली-१.२८ कोटी, कळमनुरी-८६.७७ लाख तर सेनगावात १.२२ कोटी रुपये विलंबाने अदा झाले. यात औंढा १५ हजार, वसमत ४ हजार, हिंगोली ३५ हजार, कळमनुरी ४२ हजार तर सेनगावात ३३ हजारांचा दंड लागला. यापैकी ५५ हजार वसूल झाले. तर ७५ हजारांची वसुली बाकी आहे.
विलंब शुल्काचे आतापर्यंत २.६८ लाख वसूल करण्यात आले आहेत. यात औंढा १७ हजार, वसमत ३६0८, हिंगोली-१.२७ लाख, कळमनुरी- ५९ हजार, सेनगाव ६१ हजार अशी रक्कम आहे.