मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे
By विजय पाटील | Published: March 10, 2024 07:01 PM2024-03-10T19:01:20+5:302024-03-10T19:02:52+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हिंगोली: घरातून काम करणारा, उंटावरून शेळ्या हाकणारा मी नाही. आपत्तीत थेट जनतेच्या दारी पोहोचणारा आहे. फेसबूक लाईव्ह करणारा नव्हे, तर जनतेची फेस टू फेस भेट घेणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हिंगोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते आले होते. मंचावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा.हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे, आ. बालाजी कल्याणकर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ.गजानन घुगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्याची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. राज्यात २२ कार्यक्रमांतून ५ कोटी ६५ लोकांना थेट लाभ दिला. त्यामुळे गेलो तेथे लोक प्रेम देतात. कामांचा एवढा धडाका आहे की, त्यासमोर महावलिकास आघाडीच्या लवंगी फटाक्याच्या आवाजच येत नाही.पूर्वी लोकांची कामे होत नसत त्यामुळे ते लाभाचा नादच सोडून द्यायचे. हे चित्र आता बदलले.मी स्वत:ला सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो. उद्या कोणीही सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल. ही काही कुणाची जहागिरी नाही. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो कारण तेव्हा कामे होत नसल्याने आमदार, खासदारांत नैराश्य होते. मी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यकर्त्यांसाठी नव्हे, तर सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दुष्काळी मदतीचे निकष बदलले. दोनहून तीन हेक्टरला मदत देतो. त्यातही वाढ केली. महिलांना ५० टक्के तिकिटसवलत दिली. यामुळे एसटी फायद्यात आली, इतका लाभ महिलांनी घेतला. विरोधक म्हणतात की, उद्योग पळाले. गेल्यावर्षी १ लाख ६७ हजार कोटी तर यंदा ३ लाख ७३ हजार कोटींची उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक केली. राज्य पहिल्या नंबरवर आलयं.
मुख्यमंत्री शिंदे हिंगोली जिल्ह्याबाबत म्हणाले की, येथील सिंचनाचा अनुशेष दूर करू. हळद संशोधन केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय दिले आहे. कयाधूत टनेलने येलदरी व सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा निर्णयही घेवू. इतर अनेक बाबींबात त्यांनी सकारात्मकता दाखविली.
टिकणारे मराठा आरक्षण दिले
मी छत्रपती शिवरायांची शपथ घेत आरक्षणाचा शब्द दिला होता. तो पाळला. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. ते तसेच दिले. हे आरक्षण न्यायालयात का टिकणार नाही, हे विरोधकांनी सांगावे, ते कसे टिकेल हे मी सांगतो, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तर जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. नव्या आरक्षणानुसार भरतीही सुरू झाली. त्यातील उमेदवारांना भविष्यातही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.उबाठाचे लोक यावरुन राजकारण करीत आहेत. तसे चालत नाही, लोक समजदार असल्याचेही शिंदे म्हणाले.