हिंगोलीला दगाफटका केल्यास भाजपची नांदेडची जागा पाडू; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा
By विजय पाटील | Published: April 2, 2024 01:33 PM2024-04-02T13:33:26+5:302024-04-02T13:34:47+5:30
महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे.
हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीकडून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने हिंगोली मतदारसंघातील भाजप आमदार आणि पदाधिकारी पाटील यांच्याबाबतीत सर्व्हे निगेटिव्ह असल्याचे आकांडतांडव करीत आहेत; परंतु हिंगोलीत शिवसेनेच्या उमेदवाराला काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर नांदेडची जागा पाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नांदेडात झालेल्या बैठकीत दिला.
महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे. त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. सोमवारी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये या पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मतदारसंघात त्यांनी जी कामे केली आहेत, त्याच्या जोरावर त्यांना तिकीट मिळाले आहे; परंतु आता भाजपवाले म्हणताहेत की, सर्व्हे निगेटिव्ह आले. कोणी केला सर्व्हे अन् कशासाठी? आमच्या जागेचा सर्व्हे करायला भाजपवाल्यांना कुणी सांगितले? भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही कोणीच विरोध केला नाही.
प्रताप चिखलीकरांच्या स्वागताला, त्यांच्या प्रचाराला आम्ही पुढे होतो. युती धर्माचे आम्ही पालन करीत आहोत; परंतु शिस्तीचा पक्ष म्हणून मिरविणाऱ्या भाजपाला त्याचा विसर पडला का? पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना समज का दिली नाही? पक्षश्रेष्ठींना या बाबी कळत नाहीत का? असा सवालही संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला. राज्यभरात लाेकसभेच्या शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजप दावा करीत आहेत. एकप्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. युती धर्म म्हणून समोर यायचे अन् पाठीत खंजीर खुपसायचे काम भाजपाकडून सुरू आहे; परंतु त्यांच्या या नीतीचा फटका त्यांना राज्यभरात बसू शकतो. नांदेडातही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, उमेश मुंढे, गंगाधर बडुरे, प्रल्हाद इंगोले, अशोक उमरेकर, कांचन पुरोहित, वनमाला राठोड आदींची उपस्थिती होती.
विधानसभेलाही केला होता दगाफटका
विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून राजश्री पाटील या महायुतीच्या उमेदवार असताना भाजपने त्यावेळी दगाफटका केला होता. राजश्री पाटील यांच्याविराेधात भाजपतील पदाधिकारी अपक्ष रिंगणात उतरला होता. त्यामुळे राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता. आता भाजप तशाच पद्धतीने डावपेच आखत आहे, असा संताप व्यक्त केला.
शिंदेकडे देणार पदांचे राजीनामे
हिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजीनामे देतील. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करतील. जोपर्यंत हिंगोलीच्या जागेचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत नांदेडातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही करणार नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.