शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 07:13 PM2024-08-07T19:13:11+5:302024-08-07T19:16:23+5:30

अंदाजे १० लाख रुपयांचा ऐवज लंपास; सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू

In Aundha taluka; The same gang burglarized three villages in a day | शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी

शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील गोजेगाव, येळी व हिवरखेडा येथे एकाच दिवशी भर दुपारी घरफोडी करीत लाखोंचा ऐवज लुटून चोरटे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. सदर घटना बुधवारी दुपारी २ ते ३ : ३० वाजेदरम्यान घडली. विशेष म्हणजे, तिन्ही ठिकाणी घरफोडी करणारे चोरटे एकच असल्याची माहिती आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या शेतीत निंदन, खुरपण व फवारणीचे काम जोमात सुरु आहेत. शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्यामुळे गावांतील आबालवृद्ध सध्या शेतात राबत असल्याने दिवसभर गावे निर्मनुष्य राहत आहेत. नेमका याचाच फायदा घेत औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव, येळी व हिवरखेडा येथे चोरट्यांनी भरदुपारी २ ते ४ वाजेदरम्यान घरफोडी करीत लाखो रुपयांचा ऐवज लुटला. 

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी सहकारी पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे, जमादार संदीप टाक, गाजनन गिरी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. गोजेगाव येथून घरफोडी करून दुचाकीवरून पसार होताना एकाने व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यामुळे चोरटे कॅमेरात कैद झाले असून औंढा पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

अशा झाल्या घटना
गोजेगाव येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी गंगाधर गणपतराव सांगळे यांच्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला. येथून तीन तोळ्यांची पोत व एकदानी असा सोन्याचा चार तोळ्यांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर सचिन भानुदास सांगळे यांच्या घरातील महिलांचे दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविले. दरम्यान, इतर दोन ते तीन घरांचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. गोजेगाव येथील घरफोडीनंतर चोरट्यांनी ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या येळी गावात दाखल होत राजू वैजनाथ सांगळे यांच्या घराचे कुलूप तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने व नगदी रक्कम पळविली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा हिवरखेडा येथे वळविला. तेथील बाळू अश्रोबा गीते यांच्या घरात घुसून सोन्याची पोत चोरी करून चोरटे  पसार झाले. भरदिवसा दोन तासांत तीन गावात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: In Aundha taluka; The same gang burglarized three villages in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.