वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, कळमनुरीत दोन्ही शिवसेना,तर हिंगोलीत भाजप-उद्धव सेनेचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:52 AM2024-10-28T11:52:14+5:302024-10-28T11:53:54+5:30
हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली.
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. वसमतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, तर कळमनुरी मतदारसंघात दोन्ही शिवसेना रिंगणात उतरल्या आहेत. हिंगोलीत मात्र भाजपच्या विरोधात उद्धव सेनेने उमेदवार दिल्याने लढतीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर, हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मंडळी शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे तान्हाजी मुटकुळे, तर महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेने रूपाली गोरेगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. परंपरागत काँग्रेसचा असलेला हा मतदारसंघ यावेळेस उद्धवसेनेने घेतला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध उद्धवसेना अशी लढत होईल. परिणामी, येथील लढतीकडे लक्ष लागले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उद्धवसेनेने माजी आमदार संतोष टारफे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आहेत.
वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार राजू नवघरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात आहेत. युती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे राजकीय गुरू अशी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची ओळख आहे. त्यामुळे या मतदारसंघात गुरू विरुद्ध शिष्य अशी लढाई रंगणार आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले असून, वंचित बहुजन आघाडीसह प्रादेशिक पक्षांनीही निवडणुकांची तयारी केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे
हिंगोलीत उद्धवसेनेने खेचला काँग्रेसचा मतदारसंघ....
हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेसचा दावा होता; परंतु ऐनवेळी या मतदारसंघात उद्धवसेनेने उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.